आठवणींच्या हिंदोळ्यावर दूरदर्शनला येणार सोन्याचे दिवस?


भारतातील घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारा वाहिनी दूरदर्शन! सरकारी असली तरी लोकांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी! आर्थिक उदारीकरणानंतर देशात वाहिन्यांचे पेव फुटले आणि ही राष्ट्रीय वाहिनी काहीशी मागे पडली. मात्र आजही किमान दोन पिढ्यांच्या आठवणींमध्ये दूरदर्शनला एक वेगळे स्थान आहे आणि अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले आहेत. आज कार्यक्रमांच्या माध्यमातून खासगी वाहिन्यांना टक्कर देण्याएवढी क्षमता दूरदर्शनकडे नाही, मात्र जुन्या कार्यक्रमांचा एक प्रचंड मोठा खजाना या दूरदर्शनकडे आहे आणि त्याला मोठी मागणीही आहे. आता या सरकारी वाहिनीने त्याच खजान्याचा वापर करून घ्यायचे ठरवले आहे.

भारतात सर्वात पहिला प्रसारणकर्ता होण्याचा मान दूरदर्शनकडे जातो. दूरदर्शन भारतात आला तो 1959 मध्ये. नवी दिल्लीत आकाशवाणी भवनमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या स्टुडिओतून 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शवरुन पहिले प्रसारण झाले. मराठी माणसांच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. “दूरदर्शन” हे नावही त्यांनीच सुचविलेले. पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी प्रबोधन आणि मनोरंजन यांचे मिश्रण असलेला एक तासाचा कार्यक्रम सादर करून दूरदर्शनचा श्रीगणेशा केला. प्रायोगिक तत्त्वावरचं हे प्रक्षेपण दिल्ली परिसरातच पाहता येत होते आणि तेही केवळ आठवड्यातून तीन दिवस! सुरूवातीला केवळ अर्ध्या तासाच्या शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रमांनी याचे प्रसारण सुरू झाले. मुंबईत 1972 मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झाले.

मात्र ते खऱ्या अर्थाने संपूर्ण देशात पसरले 1980 च्या दशकात. दिल्लीत 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा एशियाड झाल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री वसंत साठे यांच्या प्रयत्नांतून रंगीत प्रक्षेपण सुरू झाले आणि दूरदर्शन रंगीत झाले. त्या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालगुडी डेज, ये जो है जिन्दगी, रजनी, ही मॅन, वाह जनाब, तमस, विक्रम वेताल, टर्निंग पॉईंट, अलिफ लैला अशा अनेक मालिकांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. रामायण आणि महाभारत या दोन धार्मिक मालिकांनी इतिहास घडवला. ‘तमस’, ‘भारत एक खोज’ आणि ‘मालगुडी डेज’ यांसारख्या अनेक मालिका श्रेष्ठ साहित्यकृतींवर आधारित होत्या. ‘मालगुडी डेज’ची धून कानावर पडली की आजही त्या मालिकेतले अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यामुळेच अनेक जण आजही ती धून मोबाईलची ट्यून ठेवतात. मराठीमध्येही ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘महाश्वेता’, ‘अमृतवेल’, ‘पिंपळपान’ अशा अनेक मालिकांनी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. थोडक्यात म्हणजे 1982 ते 1992 हा काळ म्हणजे दूरदर्शनचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.

भारताने 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण केले आणि त्यानंतर उपग्रह वाहिन्यांचा टीव्ही संचावर वावर सुरू झाला. आधी 1991 मध्ये ‘स्टार इंडिया’ आले, त्यानंतर 92 मध्ये ‘झी’ची हिंदी वाहिनी दिसू लागली आणि हळूहळू हे जंजाळ वाढत गेले. त्यात दूरदर्शनची सद्दी मागे पडली आणि असंख्य वाहिन्यांच्या पसाऱ्यात एका कोपऱ्यात दडून बसण्याची वेळ एकेकाळच्या या राजावर आली.

असे असले तरी, आज खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेत मागे पडलेले भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे आजही जगातील सर्वात मोठे नेटर्वक आहे. देशातील 85 टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-1 चे कार्यक्रम पोहेचतात. आजही रंगोली आणि चित्रहार अशा कार्यक्रमांच्या आठवणींनी सुखावणारे अनेक जण आहेत. त्यांच्या मार्फत आपला व्यवसाय वाढविण्याची रणनीति दूरदर्शनने आखली आहे. त्यासाठी अॅमेझॉन या ऑनलाईन विक्रीस्थळाची मदत घेण्यात येणार आहे. कप, टी-शर्ट आणि बाटली अशा वस्तू दूरदर्शनच्या कार्यक्रमांच्या ब्रॅंड्‌सद्वारे विकण्यात येतील. दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी शनिवारी ट्वीट करून याची घोषणा केली. “तुम्ही दूरदर्शनवर प्रेम केले आहे. तुम्ही दूरदर्शनसोबत वाढला आहात. आता त्या सुखद स्मृतींचा एक तुकडा तुम्ही बाळगू शकता. अॅमेझॉन इंडियावर एक ऑनलाईन सुव्हेनिर शॉप लवकरच सुरू होत आहे,….” असे त्यांनी म्हटले आहे.

दूरदर्शनचा सुवर्णकाळ पुन्हा परत येईल, अशी शक्यता आता दिसत नाही. परंतु आपल्या भूतकाळाचा व्यवसाय करून काही प्रमाणात गेलेले वैभव आणण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. दोन पिढ्यांना मनोरंजन व प्रबोधन पुरविणाऱ्या दूरदर्शनला अशा प्रकारे सोन्याचे दिवस परत येणार असतील, तर हरकत नाही!

Leave a Comment