कहाणी जमिनीवर आलेल्या ‘आकाश’ची!


तुम्हाला आकाश नावाचा टॅब्लेट आठवतो का? सुमारे आठ वर्षांपूर्वी म्हणजे 5 ऑक्टोबर 2011 रोजी तत्कालीन तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी हा टॅब्लेट सादर केला होता. जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट अशी त्याची ओळख करून देण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांना तो 35 अमेरिकी डॉलर (तेव्हा सुमारे 1500 रुपये) एवढ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार होता. इंटरनेटच्या वापरात या टॅब्लेटमुळे क्रांती येईल, असे तेव्हा मानले जात होते. आज त्या आकाश टॅब्लेटला घरघर लागली आहे. नाव आकाश असले तरी हा टॅब्लेट जमिनीवर आला आहे. सर्वात वाईट म्हणजे आकाशचे उत्पादन बंद झाल्यामुळे सुमारे 1000 जणांची नोकरी गेली आहे.

आकाश हा अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा एक टॅब्लेट आहे. या टॅब्लेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राऊझिंगसाठी करता येतो. भारतातील 25 हजार महाविद्यालये आणि 400 विद्यापीठांमध्ये त्याचा वापर होईल, अशी सरकारची अपेक्षा होती. भारत सरकारने अंदाजे 1 लाख आकाश टॅब्लेट खरेदी केल्याचे सांगण्यात आले होते.

डेटाविंड नावाच्या कॅनडातील कंपनीने या टॅब्लेटच्या उत्पादनाचे काम हाती घेतले होते आणि आज ही कंपनीच अडचणीत आली आहे. डेटाविंड ने भारतातील आपले दोन कारखाने बंद केले आहेत आणि त्याचे कारण आकाशच्या विक्रीत आलेली घट हे आहे. या टॅब्लेटचा प्रवास सुरूवातीपासूनच अडचणीचा राहिला होता. नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर आणि देशातील कराच्या रचनेमुळेही आकाशला फटका बसल्याचे मानले जात आहे.

डेटाविंड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीतसिंह तूली यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 1500 रुपयांमध्ये जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट देण्याची रणनीती कंपनीने आखली होती. देशात उपलब्ध असलेले स्वस्त कामगार आणि परवडणाऱ्या किमतीत उत्पादन यातून हे साध्य करण्याची कंपनीची योजना होती. मात्र ज्या ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून आकाशचे उत्पादन सुरू झाले त्यांच्यावर नोटाबंदीची कुऱ्हाड कोसळली. त्यातून ते अद्याप सावरू शकलेले नाहीत.

हैदराबाद आणि अमृसर येथील कंपनीचे प्लँट बंद झाले आहेत. मात्र अमृतसर येथील कारखाना चालू असल्याचा दावा तुली यांनी इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. कंपनीने 2017 मध्ये हैद्राबाद येथील कारखान्यात उत्पादन अर्ध्यावर आणले होते, मात्र आता तेथे उत्पादन पूर्णपणे बंद आहे. कंपनीवरील कर्जाचे ओझे वाढून 250 कोटी रुपये झाले आहे, मात्र ही रक्कम अन्य कंपन्यांकडे थकली असल्याचे तुली यांचे म्हणणे आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी कंपनी न्यायालयात खटले चालवत आहे.

खरे तर डेटाविंडने नोटाबंदी किंवा जीएसटीला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ पाहिले असते तर बरे झाले असते. सुरूवातीपासूनच या टॅब्लेटबाबत अनेक तक्रारी होत्या. बुकिंग केल्यानंतरही टॅब्लेट न मिळणे, ही त्यातील प्रमुख तक्रार होती. ‘आकाश’च्या पहिल्या आवृत्तीतच अनेक दोष आढळले होते. तरीही लाखो लोकांनी त्या पहिल्यावहिल्या ‘आकाश’साठी ऑनलाईन मागणी नोंदवली होती. त्या प्रतीक्षा यादीचे काय झाले, आकाश मिळणार का, नेमका कधी मिळणार, याची उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.एकट्या पुणे विद्यापीठांतर्गत यासाठी 81 हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. मात्र या विद्यार्थ्यांच्या हाती काहीही आले नाही. याबाबत केंद्र सरकारकडूनही काही स्पष्ट करण्यात आले नाही. देशभरातून अशी किती प्रकरणे झाली असतील, याची कल्पना करता येऊ शकते.

साधारण2010-11 च्या सुमारास टॅब्लेटची संकल्पना नवीन होती. अॅप्पलने आपला आयपॅड नुकताच बाजारात सादर केला होता, मात्र त्याची किंमत सर्वसाधारण भारतीयांना परवडणारी नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत टॅब्लेट पोचविण्यासाठी आकाशची निर्मिती करण्यात आली होती. आज आठ वर्षांनंतर परिस्थिती खूप बदलली आहे. माध्यम क्रांतीच्या या युगात संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट पीसी, इंटरनेट आणि मोबाईल या गोष्टी सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडल्या आहेत. त्यांचे फारसे अप्रूप नाही. शिवाय आकाशच्या किमतीत त्याच्यापेक्षा जास्त क्षमता असलेली, त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्षम असलेली उपकरणे अगदी ग्रामीण भागातही मिळतात. मग निव्वळ स्वस्तात म्हणून डेटाविंडचा आकाश विकत कोण घेणार? म्हणूनच ‘एक जमलेला न धंदा’ या चार शब्दांत आकाशची कहाणी संपते!

Leave a Comment