या प्रश्नांची उत्तरे देऊन या भारतीय सौंदर्यवती बनल्या विश्वसुंदरी


रिता फारिया, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, डायना हेडन, युक्ता मुखी, आणि अलीकडेच मानुषी छील्लर या भारताच्या सौंदर्यवती महिलांनी आपल्या सौंदर्य आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर जागतिक पातळीवरील ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस अर्थ असे सर्वच खिताब भारतीय तरुणींनी जिंकले आहेत. मात्र जागतिक पातळीवर आयोजित होणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुमारे सत्तर देशांच्या सौंदर्यवती महिलांना मागे टाकून विश्वसुंदरीचा खिताब मिळविण्याची कामगिरी सोपी खचितच नव्हती. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या सर्वच तरुणींना अनेक महिने पूर्वतयारी करावी लागली. अगदी चालण्या-बोलण्यापासून, स्वतःचे सौदर्य जपण्यापर्यंत आणि तिथे ऐनवेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी सततचा सराव, इथपर्यंत सर्वच काही या तरुणींसाठी महत्वाचे ठरले.

जागतिक पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या या सौंदर्यवतींना निरनिरळ्या पातळींवर जोखले जात असते. या सर्व पातळी यशस्वीपणे पार करून निवडल्या गेलेल्या दहा तरुणी अंतिम फेरीमध्ये सहभागी होत असतात. ही फेरी असते प्रश्नोत्तरांची. स्पर्धेच्या जजेसनी विचारलेल्या प्रश्नांची सर्वात योग्य आणि समाधानकारक उत्तर देणारी तरुणी विश्वसुंदरी ठरत असल्याने प्रश्नोत्तरांची शेवटची पायरी लाखमोलाची ठरत असते. १९६६ साली भारतासाठी सर्वप्रथम मिस वर्ल्डचा खिताब रिता फारिया यांनी जिंकला. रिता फारिया तेव्हा वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होत्या. डॉक्टर बनण्याची इच्छा का आहे असे प्रश्न रिताला स्पर्धेमध्ये विचारला गेला असता, महिला विशेषज्ञांची भारतामध्ये कमतरता असल्याने आपल्याला डॉक्टर बनून महिलांसाठी आणि मुलांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची इच्छा असल्याचे उत्तर रिता यांनी दिले होते.

त्यानंतर ठीक अठ्ठावीस वर्षांनी भारतासाठी पुन्हा एकदा मिस वर्ल्ड खिताब जिंकला ऐश्वर्या रायने. १९९४ साली मिस वर्ल्डचा खिताब ऐश्वर्याने जिंकला. विश्वसुंदरी बनल्यास तुम्ही काय करणार आणि आदर्श ‘मिस वर्ल्ड’ कशी असावी असा प्रश्न ऐश्वर्याला विचारला गेला असता, मिस वर्ल्ड बनल्यास त्या सम्मानासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे आपण काटेकोरपणे पालन करू असे उत्तर ऐश्वर्याने दिले होते. तसेच मिस वर्ल्ड ही केवळ रूपाने नाही, तर मनाने ही तितकीच सुंदर आणि प्रामाणिक असणे आवश्यक असल्याचे ऐश्वर्याने म्हटले होते. १९९७ साली मिस वर्ल्ड बनलेल्या डायना हेडनला, ती मिस वर्ल्ड बनल्यास तिला बक्षीस दिल्या जाणाऱ्या रक्कमेचे ती काय करणार असा प्रश्न विचारला गेला असता, तिने हे पैसे आपल्यासाठी आणि आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंसाठी खर्च करणार असल्याचे म्हटले होते. तसेच ही रक्कम योग्य रित्या गुंतवणार असल्याचेही डायनाने म्हटले होते.

डायना हेडननंतर मिस वर्ल्डचा खिताब जिंकला युक्ता मुखीने. युक्ताला तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्याबद्दल विचारले गेले असता, भारतीय आहारामध्ये अनेक विविधता असून हा आहार पोषकही असल्याचे सांगून भारतीय भोजन आपल्याला सर्वाधिक प्रिय असल्याचे युक्ताने म्हटले होते. २००० साली मिस वर्ल्ड बनलेल्या प्रियांका चोप्राला सर्वात प्रतिभावान, प्रभावी व्यक्तिमत्व कोणत्या महिलेचे आहे असे विचारले गेले असता, प्रियांकाने, मदर टेरेसा यांच्या आयुष्याने आपण अतिशय प्रभावित झालो असल्याचे म्हटले होते. मदर टेरेसा यांचा संवेदनशील, उत्साही आणि मानवताप्रेमी स्वभाव आपल्याला प्रभावित करीत असल्याचे प्रियांकाने म्हटले होते. २०१७ साली मानुषी छील्लर हिने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला. त्यावेळी जगातील कोणत्या कामाचा मोबदला सर्वाधिक असायला हवा असा प्रश्न विचारला गेला असता, आई असण्याची जबाबदारी जगामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची असून, या कामाकरिता सर्वधिक मोबदला असणे गरजेचे आहे असे उत्तर देऊन मानुषीने सर्व जजेसची मने जिंकून घेतली होती.

Leave a Comment