२०१८-१९ सालामध्ये हे ठरले सर्वोत्तम आणि सर्वात अकार्यक्षम विमानतळ


‘एअरहेल्प’ या संस्थेच्या वतीने २०१९ या वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात अकार्यक्षम विमानतळांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे ‘एअर ट्रॅव्ह्लर्स राईट्स’ आणि विमाने रद्द झाल्यास वा उशीराने प्रवास करीत असल्यास त्याची योग्य नुकसानभरपाई नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी ‘एअरहेल्प’ ही संस्था घेत असते. याच संस्थेने आता जगभरातील विमानतळांचे ‘रँकिंग’ दर्शविणारी यादी प्रसिद्ध केली असून, ‘ऑन टाईम परफॉर्मन्स’, म्हणजे विमानसेवा वेळेवर सुरु आहेत किंवा नाही, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा, विमानतळावर उपलब्ध असणारी भोजनव्यवस्था आणि त्याअंतर्गत उपलब्ध असणारे विविध पर्याय, आणि ग्राहकांना खरेदी करता यावी यासाठी विमानतळावर उपलब्ध असणारे पर्याय, या सर्व गोष्टी ‘रँकिंग’ ठरविताना विचारात घेण्यात आल्या आहेत.

‘एअरहेल्प’ ने ही ‘रँकिंग’ निरनिरळ्या विमानतळांवरील व्यावसायिक विक्रेत्यांकडून (commercial vendors) मिळालेल्या डेटाच्या आधारावर निश्चित केली आहेत. त्याचप्रमाणे ‘एअरहेल्प’ चा स्वतःचा डेटाबेस, आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये चाळीसहून अधिक देशांमधील प्रवाश्यांचे ‘फीडबॅक’ या ही गोष्टी ‘रँकिंग’ निश्चित करताना विचारात घेतल्या गेल्या आहेत. ‘एअरहेल्प’च्या वतीने घोषित करण्यात आलेल्या ‘रँकिंग’ मध्ये दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वोत्तम विमानतळ ठरला असून, त्यापाठोपाठ टोकियो येथील हॅनेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ग्रीसमधील अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोत्तम ठरले आहेत.
अमेरिकेतल न्यू जर्सी विमानतळाचा समावेश या यादीमध्ये ‘अकार्यक्षम विमानतळ’ म्हणून करण्यात आला असून, न्यूआर्क विमानतळही, येथे विमानसेवा सातत्याने उशीराने सुरु असल्याने अकार्यक्षम म्हणून उल्लेखला गेला आहे. यामागे येथे सातत्याने असणारे खराब हवामान हे मुख्य कारण असल्याचे समजते. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर थंडीच्या दिवसांमध्ये होत असणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बहुतेकवेळी विमानसेवा उशीराने सुरु असतात, त्यामुळे याही विमानतळाचे नाव यादीमध्ये पुष्कळ खालच्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये एकूण १३२ विमानतळांचा समावेश असल्याचे समजते.

Leave a Comment