भारतातून चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती अमेरिकेमध्ये सापडल्या


भारताच्या निरनिराळ्या प्रांतांमधून चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती अमेरिकेतील अनेक वस्तूसंग्रहालये तसे खासगी संग्राहकांच्या घरांची शोभा वाढवीत असल्याचे निष्पन्न झाले असून, यातील बहुतेक मूर्ती या तस्करीच्या द्वारे अमेरिकेमध्ये पोहोचल्या असल्याचे समजते. तस्करीच्या द्वारे अमेरिकेमध्ये पाठविल्या गेलेल्या शंभर कलाकृती सापडल्या असून, भारतीय पुरातत्वविभागाच्या वतीने या मूर्ती पुन्हा भारतामध्ये आणण्याची औपचारिक प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून ते बाराव्या शतकाच्या कालखंडाच्या दरम्यानच्या काळातील या मूर्ती आहेत.

या मूर्तींचे परीक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने तज्ञांची टीम अमेरिकेला पाठविण्यात आली असून, न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मदतीने अमेरिकेतील वस्तूसंग्रहालयांमध्ये आणि खासगी संग्राहकांच्या ताब्यात असलेल्या अनेक मूर्ती अंकित करण्याची जबाबदारी या टीमकडे सोपविली गेली होती. अंकित केल्या गेलेल्या या सर्व मूर्ती भारतातील विविध प्रांतांतून चोरल्या गेल्या असून, यांची तस्करी करून या मूर्ती अमेरिकेमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. या सर्व मूर्ती भारतीय पुरातत्व विभागाच्या टीमने ताब्यात घेतल्या असून, या मूर्ती सील करून भारतमध्ये परत पाठविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या मूर्तींची तस्करी करणारा सुभाष कपूर नामक तस्कर सध्या तमिळ नाडूमध्ये कारावास भोगत आहे.

अमेरिकेमध्ये सापडलेल्या या वस्तूंमध्ये पाचव्या-सहाव्या शतकातील काही आणि हडप्पा संस्कृतीकालीन अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर तमिळ नाडू येथील सुतामल्ली आणि श्रीपुरातन मंदिरातील सुंदर कलाकृतींचाही यामध्ये समावेश आहे. या मूर्तींमध्ये मध्य प्रदेशातील संरक्षित कारीतलाई स्मारकातील ‘कच्छ-मच्छ’ प्रतिमेचा समावेश आहे. पुरातत्व खात्याच्या टीमने ताब्यात घेतलेल्या या मूर्तींमध्ये दक्षिण भारतातील चोल साम्राज्यातील अनेक पाषाण मूर्तींचा ही समावेश असल्याचे समजते. यातील एकूण सतरा मूर्तींपैकी सात वस्तू काशाच्या तर उर्वरित दहा पाषाणाच्या बनलेल्या आहेत.

Leave a Comment