विमानउड्डाणाच्या दरम्यान चाळीस मिनिटे वैमानिक बेशुद्ध !


विमानउड्डाणाच्या दरम्यान वैमानिक तब्बल चाळीस मिनिटे बेशुद्ध असल्याचा धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये नुकताच समोर आला आहे. त्या चाळीस मिनिटांमध्ये एअर ट्रफिक कंट्रोलच्या एकाही संदेशाला वैमानिकाने प्रत्युत्तर दिले नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोने केलेल्या या घटनेच्या तपासामध्ये या घटनेची सविस्तर हकीकत स्पष्ट झाली आहे. या तपासामध्ये या वैमानिकाला उड्डाणाच्या आदल्या रात्री पुरेशी झोप मिळाली नसून, त्या रात्री त्याने केवळ एक चॉकोलेट बार, एक एनर्ज ड्रिंक इतकेच भोजन घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील अपुरी झोप झालेल्या या वैमानिकाने सकाळच्या नाश्त्याला फाटा देऊन उड्डाण केले होते.

हा वैमानिक घेऊन जात असेले विमान एक ‘ट्रेनिंग फ्लाईट’ असून हे विमान पोर्ट ऑगस्टाला निघाले होते. अॅडलेड जवळील पॅराफील्ड येथून हे विमान निघाले होते. या विमानामध्ये अन्य सहवैमानिक नसल्याने हा वैमानिक एकट्यानेच उड्डाण करीत होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर चाळीस मिनिटे उलटली आणि वैमानिकाला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. आदल्या रात्री अपुरी झोप आणि अपुरे भोजन यामुळे डोकेदुखी उद्भविली होती. त्रास वाढला तसे वैमानिकाने विमान ‘ऑटो पायलट’ मोड वर टाकून एक डुलकी काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच त्याची शुद्ध हरपली. त्यावेळी हे विमान जमिनीपासून साडेपाचहजार फुटांवर उडत होते.

दरम्यानच्या काळामध्ये या वैमानिकाशी संपर्क साधण्याचे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या वतीने अनेकदा निष्फळ प्रयत्न केले गेले. त्यावरून पायलटच्या सुरक्षिततेविषयी चिंता उत्पन्न होऊ लागली. या विमानाच्या जवळच उडत असलेल्या आणखी एका विमानाने हे विमान अचूक हेरले आणि पायलट बेशुद्ध असल्याचा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे पाठविला. हे विमान आणि वैमानिक सुरक्षितपणे जमिनीवर कसे आणायचे याबद्दल तातडीने हालचाल केली जात असतानाच बेशुद्ध झालेला वैमानिक शुद्धीवर आल्याचे दिसत असल्याचे दुसऱ्या विमानातील वैमानिकाने कळविले. त्यानंतर ही दोन्ही विमाने सुखरूप पॅराफील्ड येथे उतरली. आदल्या रात्री आपली व्यवस्थित झोप झाली नसून, आपली तब्येतही बरी नसल्याचे या वैमानिकाचे म्हणणे आहे. तसेच उपाशीपोटी उड्डाण केल्याने आणि झोप न झाल्याने आलेल्या शारीरिक थकव्यामुळे आपली शुद्ध हरपली असल्याचे या वैमानिकाने सांगितले. हा वैमानिक सध्या विमानचालानाचे प्रशिक्षण घेत असून, अशा ट्रेनीज् ना विमान उड्डाण करण्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळणे अतिशय आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment