कॅनडा येथे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक मोत्याचे अनावरण


कॅनडाचा निवासी असणाऱ्या चौतीस वर्षीय अब्राहम रेयेस यांनी आपल्याजवळील नैसर्गिक मोती प्रदर्शित केला आहे. हा नैसर्गिक रित्या तयार झालेला मोती ‘गिगा पर्ल’ या नावाने ओळखला जात असून, हा जगामध्ये अस्तित्वात असलेला सर्वात मोठा मोती आहे. या गिगा पर्लचे वजन थोडेथोडके नाही, तर तब्बल २७.६५ किलो असून, आतापर्यंत जगामध्ये सर्वात विशालकाय समजल्या गेलेल्या ‘लाओ त्सु’ मोत्याच्या पेक्षा गिगा पर्लचे वजन चौपट जास्त आहे. अब्राहमला हा मोती त्याच्या नातलगाकडून वारसहक्काने मिळाला असून, हा मोती गेल्या दोन पिढ्यांपासून रेयेस यांच्या कुटुंबाकडे असल्याचे समजते.

हा मोती आकाराने एखाद्या तान्ह्या नवजात अर्भकाप्रमाणे दिसत असून, याचा रंग पांढरा आहे. हा मोती सुमारे एक हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे म्हटले जात असून, अब्राहमच्या आजोबांच्या काळापासून हा मोती या कुटुंबाकडे आहे. अब्राहमच्या आजोबांनी भल्या थोरल्या शिम्पल्यामध्ये असलेला हा मोती १९५९ साली फिलिपिन्स मधील एका मच्छीमाराकडून खरेदी केला होता. हा शिंपला आणि त्यातील मोती अब्राहमच्या आजोबांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी भेट म्हणून खरेदी केला असल्याचे अब्राहम सांगतात.

अब्राहमच्या आत्याला हा मोती त्याच्या आजोबांनी दिला, आणि आता याच आत्याकडून हा मोती अब्राहमच्या संग्रही आला आहे.
आतापर्यंत आपल्याकडे असलेल्या मोत्याची किंमत किती आहे हे माहित असणे तर सोडाच, आपल्याकडे आहे हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक मोती आहे याची देखील सुतराम कल्पना, रेयेस कुटुंबियांना नव्हती. हा मोती संपूर्णपणे नैसर्गिक असल्याने याला सुंदर आकार देण्यासाठी कोणत्याही प्रक्रिया किंवा पॉलिशिंग केले गेले नसल्याने हा एक मोती आहे हे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. जेव्हा अब्राहमच्या आत्याने हा मोती अब्राहमच्या हवाली केला, तेव्हा त्याने सहजच काही तज्ञांना या मोत्याची पाहणी करण्यास बोलाविले असता, हा एक नैसर्गिक मोती असल्याचे या तज्ञांनी अब्राहमला सांगितले. आपल्याकडे असलेला जगातील सर्वात मोठा मोती पाहण्याची संधी इतरांनाही मिळावी अशी अब्राहमची इच्छा असून, निरनिरळ्या वस्तूसंग्रहालयांमध्ये आणि आर्ट गॅलरीजमध्ये हा मोती प्रदर्शित करण्याचा अब्राहमचा मानस आहे.

Leave a Comment