नव्या राजकुमारच्या सन्मानार्थ अठ्ठावीस किलो चॉकलेटचे ‘टेडी बेअर’


सहा मे रोजी प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. ब्रिटीश राजघराण्याच्या नव्या राजकुमाराच्या जन्माचा आनंदोत्सव संपूर्ण ब्रिटनमध्ये साजरा करण्यात येत आहे. नव्या राजकुमाराचे पहिले वहिले दर्शनही सर्वांना हॅरी आणि मेघनच्या औपचारिक इन्स्टाग्राम अकाऊंटवरील छायाचित्रांमधून घडले असून, ‘आर्ची हॅरिसन माउंटबॅटन विंडसर’ असे नामकरण केलेल्या या छोट्या राजकुमाराचे जनतेने उत्साहात स्वागत केले आहे.

जगभरातून राजकुमाराच्या जन्मानिमित्त अनेक अभिनंदनपर प्रतिक्रिया येत असतानाच, जगभरातील अनेक नामवंत कंपन्या आणि ब्रँड्स देखील आपापल्या परीने या आनंदोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर चॉकोलेट्स बनविणाऱ्या सुप्रसिद्ध ब्रँड ‘कॅडबरी’चे देता येईल. कॅडबरी वर्ल्ड चॉकोलेटियर्सच्या वतीने राजकुमार आर्चीच्या जन्मानिमित्त चॉकोलेटचे मोठे टेडी बेअर बनविले गेले आहे. दीड फुट उंचीचे हे टेडी बेअर कोणत्याही मशीनच्या वापराविना बनविले गेले असून, संपूर्णपणे ‘हँडमेड’ आहे.

२८ किलो वजनाचे हे टेडी बेअर बनविण्याकरिता ६२२ ‘डेरी मिल्क’ कॅडबरी बार्सचा वापर करण्यात आला असून, सीअन पॅटरसन आणि बर्नी अँड्र्यूज या कॅडबरीमध्ये काम करणाऱ्या कारागिरांनी हे भले मोठे टेडी बेअर तयार केले आहे. या पूर्वीही शाही परिवारामध्ये जन्मलेल्या अपत्यांच्या सन्मानार्थ कॅडबरीच्या वतीने अनेक चॉकोलेटने बनलेली शिल्पे तयार करण्यात आली असून, प्रिन्स विलीयमची मुलगी प्रिन्सेस शार्लोट हिच्या जन्मानंतर कॅडबरीच्या वतीने चॉकोलेटची ‘प्रॅम’, म्हणजेच बाबागाडी बनविण्यात आली होती, तर प्रिन्स लुईसच्या जन्मानंतर कॅडबरीने चॉकोलेटचा ‘रॉकिंग हॉर्स’ बनविला होता.

Leave a Comment