२०१९ साली प्रकाशित होणार या सेलिब्रिटीजनी लिहिलेली पुस्तके


या सेलिब्रिटीजनी आपल्या कलागुणांच्या जोरावर आपापल्या कला क्षेत्रांमध्ये भरपूर नाव आणि वैभव मिळविले आहे. आता ही मंडळी आपले आयुष्य, आपले अनुभव, पुस्तकरूपाने लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या तयारीत असून, यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटीजच्या आयुष्यावर, अनुभवांवर आधारित पुस्तके वाचण्याची संधी वाचक वर्गाला लाभणार आहे. सुप्रसिद्ध अभिनीते दिग्दर्शक पंकज कपूर करीत असलेला एकपात्री कार्यक्रम ‘दोपेहरी’ लवकरच कादंबरीरूपाने प्रसिद्ध होत आहे. हार्पर-कॉलिन्स प्रकाशनाच्या वतीने ही कादंबरी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. एका भल्याथोरल्या हवेलीमध्ये एकटीनेच आयुष्य व्यतीत करणाऱ्या ‘अम्मा बी’ नामक विधवा महिलेच्या आयुष्यावर आधारित ही कथा आहे.

सुप्रसिद्ध मॉडेल लिसा रे आपले आत्मचरित्र ‘क्लोज टू द बोन’ या नावाने प्रकाशित करीत आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये मिळविलेले यश, परिवारजनांशी असलेले संबंध, अनेकदा झालेले प्रेमभंग आणि अर्थातच कर्करोगाशी दिलेला यशस्वी लढा हे लिसाचे सर्वच अनुभव तिच्या आत्मचरित्रामध्ये वाचावयास मिळणार आहेत. अभिनेता संजय दत्तही यंदाच्या वर्षी आपले आत्मचरित्र प्रकाशित करण्याच्या तयारीमध्ये असून, २९ जुलैला संजयच्या साठाव्या वाढदिवशी हे आत्मचरित्र प्रकाशित व्हायचे आहे. संजयच्या बालपणीचे, बॉलीवूडमधील त्याच्या कारकिर्दीचे आणि अर्थातच त्याच्या तुरुंगवासाचे अनेक अनुभव संजयने यामध्ये उल्लेखिले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लिहिलेले अनेक लेख, कविता आणि कथा ‘अनफिनिश्ड’ नामक संग्रहाच्या रूपाने प्रकाशित होणार आहेत, तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तक ‘इंटर्वल’ नावाने प्रसिद्ध करीत आहेत. रीता गुप्ता या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. अभिनेत्री दीप्ती नवल यांचेही आत्मचरित्र ‘अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड’ या नावाने प्रसिद्ध होत असून, यामध्ये दीप्तीने आपल्या बालपणीचे अनेक अनुभव कथन केले आहेत.

Leave a Comment