ऑस्ट्रेलियामध्ये नव्याने छापलेल्या पन्नास डॉलर्सच्या नोटांवर ‘टायपो एरर’!


‘अल जझीरा’ ने दिलेल्या वृत्ताच्या अनुसार एका रेडियो स्टेशनने प्रसारित केलेले वृत्त ऐकल्यानंतर एका श्रोत्याने या वृत्ताला दुजोरा देण्यासाठीच म्हणून की काय, नव्याने छापल्या गेलेल्या पन्नास ऑस्ट्रेलियन डॉलरच्या नोटेचे छायाचित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केले. हे छायाचित्र लवकरच व्हायरल झाले. नव्याने छापल्या गेलेल्या पन्नास ऑस्ट्रेलियन डॉलरच्या नोटेवर असलेल्या मजकुरातील स्पेलिंगची चूक दर्शविणारे हे छायाचित्र होते. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर काही वेळाने ऑस्ट्रेलियन रिझर्व्ह बँकेच्या वतीने देखील नोटेवरील मजकुरातील स्पेलिंग मध्ये चुका, म्हणजेच ‘टायपो एरर’ झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

पन्नास डॉलर्सच्या या नोटेवर एडिथ कोवन यांचे छायाचित्र आहे. एडिथ १९२१ ते १९२४ या काळामध्ये ऑस्ट्रेलियन संसदेच्या प्रथम महिला सदस्य म्हणून कार्यरत होत्या. १९९५ पासून त्यांचे छायाचित्र पन्नास डॉलर्सच्या नोटेच्या मागच्या बाजूला छापले जात आहे. अलीकडे छापलेल्या पन्नास डॉलर्सच्या नोटेवर असलेल्या मजकुरामध्ये ‘responsibility’ या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चूक असून, हा शब्द ‘resposibilty’ असा छापला गेला आहे. या पन्नास डॉलर्सच्या नोटा मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून वापरात आणण्यात आल्या आहेत.

नोटेवरील मजकुरातील स्पेलिंगची चूक ऑस्ट्रेलियन रिझर्व्ह बँकेने स्वीकारली असून, या नोटा चलनातून रद्द करण्याचा मात्र रिझर्व्ह बँकेचा विचार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या पन्नास डॉलरच्या चारशे मिलियन नोटा ऑस्ट्रेलियामध्ये चलनात आहेत. पुढच्या खेपेला नव्या पन्नास डॉलर्सच्या नोटा छापताना त्यावरील मजकुरातील स्पेलिंगमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्याची खबरदारी घेतली जाईल असे रिझर्व्ह बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment