गुगली मोदींची, फटका पित्रोदांचा…आऊट काँग्रेस


आपल्या विरोधकांना चुका करायला लावून त्याचा फायदा घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कोणी धरणार नाही. लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेस नेतृत्वाला बॅकफूटवर जाण्यास पार पाडले आहे, त्याला तोड नाही. मागील निवडणुकीत जे काम मणिशंकर अय्यर यांनी केले तेच या निवडणुकीत सॅम पित्रोदा यांनी केले आहे. गेल्या वेळेस चायवाला म्हणून केलेल्या उपहासाचा जो पूरेपूर फायदा मोदींनी उठविला, तोच आता पित्रोदांनी केलेल्या महागफलतीचा ते आता उचलणार यात संशय नाही.

तंत्रज्ञ म्हणून ओळख असलेले आणि आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मार्गदर्शक मानले जाणारे सॅम पित्रोदा यांनी अत्यंत असंवेदनशील टिप्पणी केली. दिल्लीत 1984 मध्ये झालेली शीखांची कत्तल (दंगल नव्हे!) झाली तर झाली, अशा अर्थाचे वाक्य त्यांनी उच्चारले. मतदानाच्या सहाव्या टप्प्याच्या ऐन आधी आलेल्या शाब्दिक बॉम्बमुळे काँग्रेसच्या शिबिरात हाहाःकार उडाला नसता तरच नवल. अन् नरेंद्र मोदींनी त्याचा फायदा घेतला नसता तर आणखीच नवल ठरले असते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शीख समुदायाविरोधात मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. त्यात शीखांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली होती आणि त्यात काँग्रेस नेत्यांचा हात होता. तेव्हा नुकतेच पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींनी त्या कत्तलीचे समर्थनही केले होते. काँग्रेसच्या दृष्टीने 1984 ची ती घटना ही एक भळभळती जखम आहे. लोकसभा निवडणुकीचे उरलेले दोन टप्पे मुख्यतः उत्तर भारत, दिल्ली आणि पंजाबमध्ये आहेत आणि तेथे हा मुद्दा प्रभावी ठरणार आहे. म्हणून हे सगळे रामायण!

या प्रकरणी शिखांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत, की काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे एक नेते व पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते एच. एच. फूलका यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाचा 1984 मधील शीखविरोधी दंगलींमध्ये हात होता त्यामुळे त्या पक्षाशी हातमिळवणी करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. फूलका हे वकील असून शीखविरोधी दंग्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते गेली 35 वर्षे कायदेशीर लढा देत आहेत.

सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराचा शेवटचा दिवस शुक्रवारी होता. हरियाणातील रोहतक येथे सभेत बोलताना मोदी म्हणाले, की पित्रोदा यांचे हे वाक्य म्हणजे काँग्रेसचे ‘‘चरित्र आणि मानसिकता’’ दर्शविते. ‘‘देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारी काँग्रेस असंवेदनशील आहे आणि काल बोललेल्या तीन शब्दांतून ते प्रकट होते. हे शब्द उगाच बोललेले नाहीत. हे शब्द काँग्रेसची मानसिकता आणि नीयत आहे,’’ असे मोदी म्हणाले. त्याला उत्तर देताना काँग्रेसची भंबेरी उडणार हे निश्चित.

एकीकडे काँग्रेसने पित्रोदा यांच्यापासून अंतर राखण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे स्वतः पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आल्याचा दावा केला आहे.

वास्तविक मोदींनी टाकलेल्या गुगलीला काँग्रेसचे नेतृत्व फशी पडल्याचे हे निदर्शक आहे. पाच टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी यांनी राजीव गांधी यांचा उल्लेख केला. मि. क्लीन अशी प्रतिमा असलेले राजीव गांधी भ्रष्टाचारी क्रं. 1 म्हणून मरण पावले, असे ते म्हणाले. यावरून त्यांना अपेक्षित होते तशीच काँग्रेस नेतृत्वाने घाईघाईने प्रतिक्रिया दिली. राजीव गांधींचा बचाव करताना काँग्रेस नेत्यांकडून काही ना काही वावगे बोलले जाईल, याची मोदींना पूर्ण खात्री होती. तरी दिग्विजय सिंह आणि मणिशंकर अय्यर यांच्यासारखे तोंडाळ नेते सध्या गप्प असल्याने काँग्रेसच्या बाजूने आतापर्यंत तरी सामसूम होती, कोण वेडेवाकडे बोलले नव्हते. मात्र राजीव गांधींचे जवळचे सहकारी असलेले पित्रोदा यांना दम धरविला नाही आणि त्यांनी आपले तोंड उघडले. त्यातून व्हायचे तेच झाले.

नरेंद्र मोदींनी टाकलेल्या गुगलीवर पित्रोदांनी फटका मारला आणि तो चेंडू अलगद मोदींच्या हातात विसावला. पण बळी मिळाला काँग्रेसचा! गुगली मोदींची, फटका पित्रोदांचा…आऊट काँग्रेस अशी नोंद झाली. आता हा फायदा मोदी कुठपर्यंत खेचून नेतात हे पाहायचे.

Leave a Comment