एकीकडे विराट…दुसरीकडे भारतीय नौकांची चीनच्या सागरात मुसंडी


भारताच्या राजकारणात आयएनएस विराट आणि तिच्या वापराबाबत तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भारतीय नौकांनी चीनच्या सागरात मुसंडी मारली आहे. चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय युद्धनौका अमेरिकेच्या नौकांच्या बरोबरीने चिनी सागरात शिरल्या. सर्वच भारतीयांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

अमेरिका, भारत, जपान आणि फिलीपाईन्स या देशांची संयुक्त नौदल प्रात्यक्षिके दक्षिण चीन समुद्रात पार पडली. या सागरावर चीनने दावा केला असून याच जलमार्ग क्षेत्रात या सर्व देशांच्या नौदलांनी संयुक्त सराव करणे याला खास महत्त्व आहे. एकप्रकारे हे शक्तिप्रदर्शनच आहे. या सागरी सरावात अमेरिकेची विध्वंसक युद्धनौका युएसएस विल्यम पी. लॉरेन्स, भारताच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस शक्ती या दोन युद्धनौका, जपानची विमानवाहू युद्धनौका इजुमोला आणि फिलीपाईन्सची गस्तीनौका बीआरपी अँड्रेस बोनिफेसिओ सामील आहेत. इजुमोला ही जपानच्या स्वतःच्या दोन मोठय़ा विमानवाहू युद्धनौकांपैकी एक आहे. या क्षेत्रातील प्रादेशिक वादामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार देशांनी हातमिळवणी केली आहे.

“आमचे सहकारी, भागीदार आणि मित्रदेशांसोबत संबंध प्रगाढ करण्याची ही संधी आहे,” असे अमेरिकेच्या नौदलाचे कमांडर अँड्र्यू जे. क्लग यांनी गुरुवारी सांगितले. क्लग हे युएसएस विल्यम पी. लॉरेन्सचे कप्तान आहेत. हा सराव साधारण आठवडाभर चालला आणि आता तो संपला आहे.

हा सराव सुरू असताना सोमवारी अमेरिकेच्या दोन युद्धनौका दक्षिण चीन सागरात चीनने तयार केलेल्या कृत्रिम बेटाजवळून गेल्या होत्या. यावर चीनने आक्षेप घेऊन आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. मात्र संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रामध्ये स्वतंत्र संचारासाठी अशाप्रकारच्या मोहिमांचे आयोजन केले जाते, असे प्रत्युत्तर अमेरिकेने चीनला दिले होते. तसेच हा ताजा सराव म्हणजे चीनला आव्हान देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक नवीन प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा सांगितला आहे आणि त्यामुळे विशेषतः जपानसोबत त्याची तणावाची स्थिती आहे. इतकेच नव्हे तर चीनने दक्षिण चीन सागरात एच-6 के बॉम्बवर्षक विमाने तैनात केली आहेत. ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान आणि व्हिएतनाम या देशांचाही दक्षिण चीन समुद्रावर स्वतःचा दावा आहे. अशा स्फोटक परिस्थितीत भारतीय युद्धनौकांनी या वादग्रस्त भागात जावे, हे लक्षणीय आहे.
या संयुक्त सरावाचा उद्देश समुद्री सहकार्य वाढवणे, समुद्री गतिविधींचे समन्वय करणे, सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करणे आणि कार्यप्रणालींचे प्रमाणीकरण करणे हा आहे,” असे भारतीय नौदलाने एका वक्तव्यात म्हटले आहे.

व्हिएतनामच्या सागर किनाऱ्यावर ओएनजीसीची चार तेलक्षेत्रे आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यकता पडली तर भारतीय नौदल हस्तक्षेप करेल, असे भारतीय नौदलाने अनेकदा स्पष्ट केले आहे. ओएनजीसीच्या या प्रकल्पासाठी व्हिएतनामने तेल आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारताला खास निमंत्रण दिले होते. तेव्हाही चीनने त्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दक्षिण चीन सागरात शांती आणि स्थैर्य अबाधित राहिले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे चीन याला तीव्र विरोध करेल, असे चीनच्या वतीने सांगण्यात आले होते.

मात्र या तेलक्षेत्राच्या संरक्षणासाठी आवश्यकता पडल्यास भारतीय नौदल दक्षिण चीन सागरात तैनात करण्यात येईल, असे तत्कालीन नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. भारतीय नौदलाकडे असलेल्या अण्वस्त्रधारी पाणबुडी आयएनएस चक्र आणि विमानवाहू युद्धनौका आयएनएस जलाश्व यांचा उपयोग दक्षिण चीन सागरात समुद्रात करण्यात येईल, असेही अॅडमिरल जोशी म्हणाले होते. बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या वतीने अमेरिकेच्या नौदलाच्या सोबत “मलबार” हा सराव दरवर्षी घेण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी भारताने त्यात जपानच्या नौदलाला सामील करून घेतले तेव्हाही चीनच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. मात्र “इतर देशांच्या नौदलांना आम्ही एकत्र आहोत, हाच महत्वाचा व्यूहात्मक संदेश देण्यात आला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यावेळी अमेरिकेकडून देण्यात आली होती.

चीनचा एवढा मोठा हट्ट आणि हेकेखोरपणा मोडून काढून आज भारतीय नौका डौलाने चीनच्या सागरात संचार करत आहेत. आयएनएस विराटचा गैरवापर झाला किंवा नाही, हा भाग अलाहिदा. मात्र आजचे आपले नौदल भारताची शान उंचावत आहे, हे नक्की. तेवढा अभिमान बाळगायला हरकत नाही.

Leave a Comment