व्हायरल ; नेटकऱ्यांना अस्सल मालवणी कॉमेंन्ट्रीने हसवले


आपल्या देशातील अनेकजणांच्या गळ्यातील क्रिकेट हा खेळ जाणून काही ताईतच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आंतरराष्ट्रीय स्तरासह आपल्या देशातील अनेक शहरात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. पण याच स्पर्धेदरम्यान अनेक मजेशीर किस्से घडतात आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन स्थानिक संघांमधील क्रिकेट सामन्याची काँमेंन्ट्री चक्क मालवणी भाषेत या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे.


फलंदाज षटकार मारायला जाण्याच्या नादात उंच चेंडू मारून झेल बाद होताना या व्हिडिओमध्ये दिसतो. मात्र या सर्व प्रसंगाची त्यापेक्षाही अधिक रंजक मालवणीमध्ये केलेले कॉमेंन्ट्री आहे. जितू नावाच्या खेळाडूने उंच हवेत गेलेला झेल अचूक पकडल्यानंतर कॉमेंन्ट्री करणाऱ्याने केलेल्या या क्षणाचे वर्णन खूपच अफलातून असून यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ‘मोठो फटकोओओ… चेंडू हवेत जितू चेंडूच्या खाली आणि जितूच्या वयात येऊन चेंडू पडलो. उघडलेल्या तिरफळात जसो दाणो तयार होता.. सवासणीच्या घोट्येत जसो नारळ भरलो जाता… जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता… तसा अतुलने दिल्यान् अन् हे आमंत्रण जितूने घेतल्यान्. दुसरा कलम लागला राहुलच्या नावाचा. अन् हसत हसत राहुल तंबूच्या दिशेने परतताना,’ अशी भन्नाट कॉमेंन्ट्री ऐकू येत आहे. या कॉमेंटेटरने इतक्यावरच न थांबता बाद झालेल्या राहुल नावाच्या फलंदाजाची खास मालवणी भाषेत खिल्लीही उडवली आहे. एखाद्याने झोपेतून उठूनही चौकार मारला असता एवढ्या साध्या चेंडूवर फलंदाज बाद झाला आहे असा टोला कॉमेंटेटरने लगावला आहे. या कॉमेंटेटरने ‘राहुल अशा बॉलवर तू आऊट झालसं ज्या बॉलवर झोपेतून उठाणसुद्धा कोणी चौकार मारलो असतो. पण त्या बॉलवरसुद्धा तू आऊट. म्हणजे असा म्हटला जाता जर हे वाईट असा तर झाडावर चढलेल्या माणसाला पण येऊन कुत्रो चावता,’ अशी तुलना केली आहे.