अशी होती सुप्रसिद्ध अभिनेते मेहमूद यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द


उत्तम अभिनय, उत्तम अवगत असलेली संगीत कला आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे अभिनेते मेहमूद यांनी दर्शकांना नेहमीच निखळ मनोरंजनचा आनंद दिला. अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नावारूपाला आलेले मेहमूद बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडीयन म्हणून आजही ओळखले जातात. आज मेहमूद हयात असते, तर ते ८४ वर्षांचे असते. त्यांच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीविषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

मेहमूद यांचा जन्म मुंबईमध्ये १९३२ साली झाला. मेहमूद यांना सात भांवांडे असून, त्यांच्या आई मुमताज अली १९४०-५० च्या दशकामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका म्हणून ओळखल्या जात असत. मेहमूद यांच्या भगिनी मीनू मुमताज याही सुप्रसिद्ध नर्तकी म्हणून ओळखल्या जात असत, तर त्यांचे सर्वात धाकटे बंधू अन्वर अली निर्माते असून, त्यांनी ‘खुद्दार’ आणि ‘काश’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. मेहमूद यांना चित्रसृष्टीचा सहवास अगदी लहानपणापासूनच घडत आला. आपल्या वडिलांच्या सोबत ते अनेकदा फिल्म स्टुडिओमध्ये जात असत. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मेहमूद यांनी बालकलाकार म्हणून ‘किस्मत’ नामक चित्रपटापासून केली. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये बस्तान बसवीत असतानाच मेहमूद यांनी उपजीविकेसाठी इतरही लहान मोठी कामे केली.

बॉम्बे टॉकीज या प्रोडक्शन कंपनीसोबत काम करत असताना एका गुणी कलाकाराशी मेहमूद यांची मैत्री झाली. हा कलाकारही महमूद यांच्याप्रमाणेच उत्तम अभिनेता आणि गायक होता. या कलाकाराचे नाव होते किशोर कुमार. किशोर कुमार यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला, आणि पाहता पाहता ते यशस्वी गायक-अभिनेते बनले. जेव्हा किशोर कुमार यांच्याकडे त्यांच्या चित्रपटात भूमिका मागण्यासाठी मेहमूद गेले, तेव्हा किशोर कुमार यांनी त्यांना भूमिका देण्यास आढेवेढे घेतले. कारण अतिशय सरळ होते. किशोर कुमार यांना त्यांच्या इतकाच गुणी कलाकार त्याच चित्रपटामध्ये असणे योग्य वाटले नाही. त्यावर, ‘जेव्हा आपण चित्रपट बनवू तेव्हा त्यामध्ये भूमिका देऊ करू’, असे मेहमूद यांनी किशोदांना सांगितले, आणि त्यांनी आपला हा शब्द पाळलाही. मेहमूद यांच्या प्रोडक्शन कंपनीने निर्मिती केलेल्या ‘पडोसन’ या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांना मेहमूदनी भूमिका देऊ केली. किशोरदांच्या बरोबर मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे हा चित्रपट आजही दर्शकांच्या आठवणींमध्ये घर करून राहिलेला आहे.

१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘परवरिश’ या चित्रपटामध्ये मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेनंतर मेहमूद यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली. त्यानंतर आलेल्या ‘प्यासा’ आणि ‘सीआयडी’ यातील मेहमूदच्या भूमिकाही प्रेक्षकांनी पसंत केल्या. त्यानंतर मेहमूद यांच्या अभिनय कारकीर्दीने भरारी घेतली. मेहमूद यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिकांना दर्शकांकडून खूप प्रशंसा लाभली. मेहमूद आणि शुभा खोटे यांच्या विनोदी भूमिका असलेला ‘ससुराल’ हा चित्रपटही अतिशय लोकप्रिय झाला. त्यानंतर याच जोडीने अभिनय केलेल्या ‘गृहस्थी’, ‘भरोसा’, ‘झिद्दी’ आणि ‘लव्ह इन टोकियो’ या चित्रपटांनाही खूप लोकप्रियता लाभली. १९६०-७०च्या दशकामध्ये विनोदी चित्रपटांना चांगली लोकप्रियता मिळत होती. याच काळामध्ये आलेल्या मेहमूद अभिनीत ‘पडोसन’, ‘भूत बंगला’ आणि अर्थात ‘बॉम्बे टू गोआ’ या चित्रपटांना अपार लोकप्रियता लाभली. आजच्या काळामध्येही हे चित्रपट ‘एव्हरग्रीन’ म्हणून ओळखले जातात.

मेहमूद हे स्वतः उत्तम अभिनेते होतेच, पण त्यांना अभिनय आणि संगीतकलेची उत्तम पारखही होती. किंबहुना सुप्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांना मेहमूद यांनी सर्वप्रथम संगीतकार म्हणून काम करण्याची संधी दिली. मेहमूद यांच्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटासाठी बर्मन यांनी सर्वप्रथम संगीत दिले. तेव्हापासून मेहमूद आणि आर डी बर्मन यांच्या मध्ये जुळून आलेले मैत्रीचे संबंध आयुष्यभर टिकून राहिले. आजच्या काळामध्ये बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे त्याकाळी सिनेसृष्टीत आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा अमिताभ यांच्याकडे मुंबईमध्ये राहण्यासाठी जागा नसल्याचे महमूद यांना समजल्यावर मेहमूद यांनी अमिताभ यांना आपल्या घरामध्ये ठेऊन घेतले होते. त्यानंतर मेहमूद यांनीच अमिताभ यांना ‘बॉम्बे टू गोआ’मध्ये भूमिका दिली होती.

आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मेहमूद यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. १९८०-९० च्या दशकांमध्ये मात्र बॉलीवूडमध्ये इतरही अनेक कॉमेडीयन्सचे नाव होऊ लागल्यानंतर मेहमूद यांना भूमिका मिळेनाशा झाल्या. १९९६ साली ‘दुश्मन दुनिया का’ हा मेहमूद यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये मेहमूद यांचा मुलगा मंझूर अली याची प्रमुख भूमिका होती. मेहमूद यांचा दुसरा मुलगा मकसूद (लकी) अली याने ही त्या काळापर्यंत पॉप संगीतविश्वात चांगले नाव कमाविले होते. २००४ साली, आजारपणाच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले असताना, २३ जुलै रोजी मेहमूद यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.

Leave a Comment