भाविकांसाठी खुली झाली केदारनाथ धामाची द्वारे


नऊ मे रोजी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर, सकाळी ५.३५ वाजता ‘जय केदार’च्या जयघोषामध्ये केदारनाथ धामाची द्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली. मंदिरामध्ये विराजमान असलेल्या केदारनाथाच्या पंचमुखी मूर्तीच्या दर्शनार्थ आता पुढील सहा महिने भाविकांची मोठी गर्दी इथे होणार आहे. केदारनाथ मंदिराची द्वारे खुली करण्यात येत असताना सुमारे पाच हजार भाविक येथे आधीपासूनच उपस्थित होते. हे सर्वच जण या शुभ प्रसंगाचे साक्षी ठरले. द्वारे खुली करण्यापूर्वी पहाटे केदारेश्वराच्या पालखीची पूजा करण्यात येऊन नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालखी सजविण्यात आली. वेदपाठी, पुजारी, आणि हक्कूधारकांच्या उपस्थितीमध्ये अखंड मंत्रोच्चारण करीत मंदिराची द्वारे खुली करण्यात आली. पुजारी आणि वेदपाठी ब्राह्मणांनी मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता केल्यानंतर केदारेश्वराच्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर केदारेश्वराची यथासांग पूजा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर सकाळी सहाच्या सुमाराला भाविकांना केदारेश्वराचे दर्शन घेण्याची अनुमती देण्यात आली.

यावेळी जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या बँडच्या सह भाविकांचे जयघोष आणि अखंड मंत्रोच्चारण यामुळे सर्व वातावरण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने भरलेले होते. केदारनाथ मंदिराची द्वारे खुली करण्याआधी केल्या जाणाऱ्या पूजेसाठी सर्व सामग्री काही काळ आधीच भारतीय वायुसेनेच्या विमानाद्वारे येथे आणली गेली होती. आता सुरु होत असलेल्या केदारनाथ यात्रेमध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींना तोंड द्यावे लागू नये यासाठी स्थानिक आणि राज्य प्रशासनानेही व्यापक तयारी केली असल्याचे समजते. भाविकांची गर्दी या दिवसांमध्ये वाढणार असल्याने सध्या सुरु असलेले ‘चारधाम रस्त्या’चे काम थांबविण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या परिसरामध्ये पुनर्निर्माणाचे कार्य सुमारे ऐंशी टक्के पूर्ण झाले असून, बद्रीनाथ धाम येथेही भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या असल्याचे समजते.

यात्रेच्या संपूर्ण मार्गावर विवेकानंद स्वास्थ्य मिशनच्या वतीने आवश्यक त्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दर दोन किलोमीटरच्या अंतरावर ही चिकित्सालये भाविकांच्या सेवार्थ उभारण्यात आली आहेत. केदारनाथ यात्रेला सुरुवात झाल्यापासून यात्रा समाप्त होईपर्यंत केदारनाथ परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी आता हे अर्थार्जनाचे दिवस आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी जागोजागी विश्रांतीस्थळे चालवून, भाविकांसाठी डोली उपलब्ध करून देण्याचे किंवा सामान वाहून नेण्याचे काम करून हे स्थानिक लोक आपली उपजीविका चालवीत असतात. या परिसरामध्ये असणाऱ्या सुमारे ऐंशी गावांतील ग्रामस्थांची उपजीविका या यात्रेवर अवलंबून असते.

केदारेश्वरची यात्रा ज्या दिवशी सुरु होते, तो दिवस केदारेश्वराच्या परिसरामध्ये नूतन वर्षाच्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक स्थानिक व्यावसायिक नव्या कामांची शुभ सुरुवात करतात. या दिवाशी सर्व कामे आणि यात्रा, पालनकर्ता, संरक्षक मानल्या जाणाऱ्या केदारेश्वराच्या साक्षीने सुरु होतात. देश-विदेशातील अनेक भाविक या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. सध्या या परिसरामध्ये अजूनही पुष्कळ बर्फ असून, भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचता यावे या करिता बर्फ हटवून रस्ता तयार करण्यात आला आहे.