जगाच्या उरात धडकी भरवणारी चीनची युद्धनौका


जागतिक महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चिनी नौदलाने गेल्या काही वर्षांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या या राक्षसी महत्त्वाकांक्षेची भीती केवळ भारतासारख्या शेजाऱ्यांना नाही तर जपान आणि अमेरिकेसारख्या देशांनाही आहेत. म्हणूनच चीनने हाती घेतलेल्या एका महाकाय जहाजाच्या बांधणीची छायाचित्रे समोर आल्यामुळे जगाच्या उरात धडकी भरली आहे.

अमेरिकेच्या एका थिंक टँकने उपग्रहाद्वारे घेतलेल्या नवीन प्रतिमा जाहीर केल्या आहेत. ही छायाचित्रे चीन बांधत असलेल्या विमानवाहू नौकेच्या असल्याचे सांगितले जात असून या जहाजाच्या महाकाय आकारामुळे तज्ञही संभ्रमित झाले आहेत.

शांघायजवळ असलेल्या जियांगनान या बंदरात या जहाजाची बांधणी सुरू आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) या संस्थेने ही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. एप्रिल महिन्यापासून ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. यात या नौकेचे प्रचंड मोठे शीड आणि मुख्य भाग दिसत असल्याचे सीएसआयएसने म्हटले आहे. काही ठिकाणी हा मुख्य भाग 40 मीटर (131 फूट) एवढा रुंद आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या जहाजाच्या आकार आणि प्रमाणावरून तरी चीनच्या टाईप 002 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहुप्रतीक्षित नौकेचे संकेत या बांधणीतून मिळत आहेत. मात्र त्याबद्दल निश्चित सांगणे अवघड आहे.

“आम्ही जियांगनान येथे जे काही पाहत आहोत ते टाईप 002 च्या निर्मितीच्या अपेक्षेला अनुरूप आहे. बांधणी सुरू असलेला आकार खूप मोठा आहे, त्यामुळे ते अन्य काही असण्याची शक्यता खूप कमी आहे,” असे सीएसआयएसचे विश्लेषक मॅथ्यू फुनायोले यांनी सीएनएन वाहिनीला सांगितले.

चीनकडे सध्या दोन स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आहेत. त्यातील लिओनिंग ही नौका नौदलात कार्यरत आहे. दुसऱ्या नौकेच्या समुद्रात चाचण्या सुरू असून तिसऱ्या व अधिक आधुनिक युद्धनौकेची बांधणी चालू असल्याच्या चर्चा गेले वर्षभर सुरू आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने नवीन युद्धनौका येणार असल्याचे संकेत दिले होते. “आपल्या (पहिल्या) स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची चाचणी घेऊन सहा वर्षे झाली आहेत. नौदलातील त्याचा प्रवेश आता होण्याच्या बेतात आहे. नवीन विमानवाहू नौकाही बांधण्यात आली आहे,” असे तेव्हा झिन्हुआने म्हटले होते. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या अंदाजानुसार, या युद्धनौकेचे काम 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या नवीन मॉडेलमध्ये अधिक प्रगत लाँन्च प्रणाली असण्याची शक्यता आहे म्हणजेच या नौकेवरून अधिक मोठे आणि जास्त विमाने उड्डाण करू शकतात.

गेल्या काही वर्षांत चीनने अत्यंत झपाट्याने नौदलाची ताकद वाढवली असून 2016 आणि 2017 च्या दरम्यान चिनी नौदलाने 32 नवीन जहाजे सेवेत आणली. त्या तुलनेत अमेरिकेने 13 नौका कमिशन केल्या. आयआयएसएस या दुसऱ्या थिंक टँकच्या 2018 च्या अहवालानुसार, 2014 पासून चीनने जर्मनी, भारत, स्पेन, तैवान आणि ब्रिटनच्या नौदलाकडे असलेल्या एकूण नौकांपेक्षा जास्त पाणबुड्या, युद्धनौका आणि अन्य साहित्य आणले आहे. तसेच सागरी हद्दीबाबत चीनचे फिलीपाईन्स, व्हिएतनाम, तैवान, मलेशिया या देशांसोबत वाद सुरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने नौदलाचे सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे अन्य देशांनीही चिनी नौदलाचा धसका घेतला आहे.

विशेषतः भारताला तर याबाबत फारच सजग राहावे लागणार आहे. चीनने समुद्री मार्गाद्वारेही भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू करूनही मोठा काळ उलटला. काही वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्यापूर्वी तब्बल नऊ दिवस चीनच्या नौदलाची पाणबुडी कोलंबो येथे मुक्कामाला होती. दक्षिण महासागरातील हा भाग भारताच्या दृष्टीने अत्य़ंत संवेदनशील भाग आहे. मात्र बंगालच्या उपसागरापासून ते हिंद महासागरापर्यंत चिनी नौदलाच्या पाणबुड्यांचा नेहमीच वावर असतो. मात्र ज्या भागामध्ये चिनी पाणबुडी होती या भागात त्यापूर्वी चिनी पाणबुड्या कधीही आलेल्या नव्हत्या.

वास्तविक चीनचे नौदल ग्रीन वॉटर नेव्हीकडून ब्लू वॉटर नेव्हीकडे प्रवास करत आहे. म्हणजे केवळ आपल्या सागरी किना-यांचे रक्षण करून चीन थांबणार नाही, तर खोल समुद्रातही वर्चस्व गाजविण्याची त्याची इच्छा आहे. हा सर्व त्याच नियोजनाचा भाग आहे. अर्थात चीनच्या या महत्त्वाकांक्षेमुळे अन्य देश सावध होऊन ते भारताला सहकार्य करणार असतील, तर ते भारताच्या पथ्यावर पडणारे आहे हे खरे. ते होईल तोपर्यंत या घडामोडीमुळे तरी आपण सतर्क होणे ही सध्याची गरज आहे.

Leave a Comment