या बसचालकाने आपल्या बसमध्येच फुलविली लहानशी ‘मिनी लालबाग’ !


कर्नाटक राज्यातील एका बसचालकाने एक आगळीच कल्पना अंमलात आणली असून, त्यामुळे त्याची व त्याच्या बसची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. आताच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगची समस्या समस्त जगाला भेडसावत असताना या बसचालकाने मात्र स्वतःच्या बसमध्येच एक लहानशी हिरवीगार बाग फुलवून हरित पर्यावरणाचा मोलाचा संदेश दिला आहे. जनतेमध्ये हरित पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बेंगळूरू मेट्रोपोलिटन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बसचालक म्हणून काम करीत असलेल्या नारायणाप्पा यांनी आपल्या बसमध्ये लहान लहान कुंड्यांमधून सुंदर बाग फुलविली आहे. म्हणूनच नारायणाप्पा यांच्या बसमधून नेहमी प्रवास करणारी प्रवासी मंडळी आता त्याच्या बसला ‘मिनी लालबाग’ म्हणून संबोधू लागली आहेत.

नारायणाप्पा यांनी बसमधील या लहानशा बागेची कल्पना तीन-चार वर्षांपूर्वी अंमलात आणली, आणि आता त्यांच्या बसमध्ये बहरलेल्या या सुंदरशा बागेमुळे लोकांना पर्यावरणप्रेमाचे धडे मिळतील अशी आशा त्यांना आहे. नारायणाप्पा यांची ही ‘मिनी लालबाग’ दररोज कवल बीरासांद्रा ते यशवंतपूर असा प्रवास करीत असते. या मिनी लालबागेमध्ये अनेक तऱ्हेची रोपे असून, नारायणाप्पा त्यांच्या या बागेची मन लावून देखभाल करीत असतात. गेल्या काही वर्षांपासून या झाडांची निगा राखणे, त्यांना वेळेवर पाणी देणे, हा त्यांचा नित्यक्रमच झाला आहे.

नारायणाप्पांच्या या कल्पनेला प्रवासी मंडळीही भरभरून दाद देत असतात. केवळ नारायणाप्पांनाच नाही, तर त्यांच्या पत्नीला आणि तीनही मुलींना देखील बागकामाची अतिशय आवड असल्याचे नारायणाप्पा सांगतात. त्यांच्या घराच्या आसपासही त्यांनी लहानशीच पण सुंदर बाग फुलविली असून, या बागकामाच्या आवडीमुळेच बसमध्ये देखील एक लहानशी बाग फुलविण्याची कल्पना आपल्याला सुचली असल्याचे नारायणाप्पा म्हणतात. दररोज सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला नारायणाप्पा आपल्या ड्युटीवर हजर होतात. आल्या आल्या त्यांचे पहिले काम असते, ते म्हणजे आपल्या मिनी लालबागेतील झाडांना पाणी देणे. त्यानंतर जेव्हा नारायणाप्पांची शिफ्ट संपते, तेव्हा पुन्हा एकदा सर्व झाडांना पाणी घालून मगच नारायणाप्पा आपल्या घरी परततात. नारायणाप्पा यांच्या हरित पर्यावरणाच्या संदेशाने प्रेरित होऊन आता त्यांच्या बसमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनीही या झाडांची नियमित निगा राखण्यास सुरुवात केली आहे.

नारायणाप्पा आता पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. अशा वेळी त्यांना काळजी आहे आपल्या ‘मिनी लालबागेची’. त्यांच्या जागी येणारे नवे बसचालक आणि कंडक्टर त्यांच्या या बागेची व्यवस्थित काळजी घेतील किंवा नाही हा विचार त्यांना अस्वस्थ करून जात असतो. त्यामुळे त्याच रूटवर चालत असणाऱ्या आणखी एका बसच्या चालकाशी आणि महिला कंडक्टरशी संपर्क साधून त्यांना आपल्या झाडांची योग्य काळजी घेण्याबद्दल विनविले असता, त्यांनी ही विनंती आनंदाने मान्य केल्यानंतर आता नारायणाप्पा यांची काळजी दूर झाली आहे.

Leave a Comment