रणवीरसिंग कपिलदेव सोबत १० दिवस राहणार


कपिल देव महान खेळाडू आहेत. त्यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे. कपिलसर अतिशय मनमोकळे, उत्साही आणि खेळकर स्वभावाचे आहेत. त्यांच्यासोबत अधिक वेळ काढण्यासाठी १० दिवस दिल्लीत मुक्काम टाकत असल्याने बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंग याने सांगितले आहे. भारताने १९८३ साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून विश्वविजेतेपद मिळविले त्याची गोष्ट १९८३ या चित्रपटातून दाखविली जाणार असल्याचे सर्वाना माहिती आहे. यात त्यावेळी भारताचे कर्णधारपद भूषविलेल्या महान गोलंदाज कपिल देव यांची भूमिका रणवीरसिंग साकारत आहे.

रणवीरने कपिल कडून खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे मात्र त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी रणवीर अभ्यास करत आहे. त्यासाठी कपिल यांच्यासोबत १० दिवस राहणार आहे. कपिल देव यांचे चालणे बोलणे, लकबी, देहबोली रणवीरला जाणून घ्यायची आहे कारण भूमिका परफेक्ट होण्यासाठी ते आवश्यक आहे. रणवीर त्याच्या सर्व भूमिका गंभीरपणे घेतो आणि त्यासाठी खूप तयारी करतो असा त्याचा लौकिक आहे.

रणवीर म्हणतो १९८३ ला भारताने मिळविलेले विश्वविजेतेपद आणि त्या विजयाशी जोडलेल्या सर्व घटना कपिलसर याच्याशिवाय अधिक चांगल्या कोण सांगू शकणार? धर्मशाळा येथे त्यांच्या सहवासाचा लाभ मिळाला आणि ती माझ्यासाठी खास आठवण आहे. पण त्यांची भूमिका करण्यासाठी एवढे पुरेसे नाही. अजून खूप काही जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी दिल्लीत मुक्काम टाकत आहे. ज्या व्यक्तीची भूमिका साकारायची त्या व्यक्तीसह राहून त्याच्या संबंधी अधिक जाणून घेण्याची संधी मला प्रथम मिळत आहे. हा माझा भूमिकेचा अभ्यास आहे असे रणवीर म्हणतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांचे असून रिलायन्स एन्टरटेनमेंट निर्माते आहेत.

Leave a Comment