आंब्यांच्या मोसमात आस्वाद घ्या खास ‘आमरस आलू’चा


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार सरबते, कैरीचे ताजे पन्हे, उसाचा रस आणि अर्थातच आंबे हे सर्वांच्याच आवडीचे असतात. आंबे कापून खावेत,किंवा आमरस करावा, आंब्याचे आईस्क्रीम खावे किंवा आंब्याचे पापड, जॅम, जेली खावेत, या ना त्या सर्वच प्रकारे वर्षातून याच दिवसांमध्ये चाखावयास मिळणारे अवीट गोडीचे हे फळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या आहाराचा हिस्सा बनून राहते. आमरस किंवा आम्रखंड हे पुरीबरोबर किंवा पोळीबरोबर आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ असले, तरी ‘आमरस आलू’ या पदार्थाची लज्जत ही काही औरच आहे. त्यामुळे काही तरी नवीन भोजनात नेहमी असावे अशी इच्छा असणाऱ्यांनी आंब्यांच्या मोसमामध्ये हा पदार्थ अवश्य करून पाहावा. ‘आमरस आलू’ बनविण्यासाठी चारशे ग्राम आकाराने लहान असलेले थोडेसे वाफवून घेतलेले बटाटे, दोन चमचे लसुणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, एक चमचा, किंवा जितके तिखट आवडत असेल त्याप्रमाणे लाल मिरची पावडर, एक चमचा आल्याची पेस्ट, आवश्यकतेनुसार तेल, दोन ते अडीच कप आमरस, थोडेसे काळे मीठ, एक चमचा जिरे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार धणे पूड आणि गरम मसाला या साहित्याची आवश्यकता आहे.

आमरस आलू बनविण्यासाठी एक नॉनस्टिक कढई गरम करण्यास ठेऊन त्यामध्ये तेल घालवे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, हिंग आणि हळद घालावे. त्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा घालून तो परतावा आणि त्यामध्ये आले-लसुणाची पेस्ट, आणि इतर मसाले घालावेत. यामध्ये थोडेसे पाणी घालून कांदे आणि मसाल्यांचे मिश्रण चांगले शिजू द्यावे. त्यानंतर यामध्ये बटाटे घालून चवीनुसार मीठ घालावे. सर्वात शेवटी या मध्ये लिंबाचा रस आणि आमरस मिसळून ही भाजी चांगली एकजीव करावी. झाकण घालून ही भाजी सात ते आठ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी, आणि त्यानंतर गरमागरम पोळ्यांंच्या सोबत सर्व्ह करावी.

Leave a Comment