भ्रमंती अंदमान निकोबार आयलंड्सची


सुंदर निसर्गरम्य सागरी किनारे, चहु बाजूंनी निळाशार समुद्र आणि समुद्राच्या उदरामध्ये दडलेला समुद्री खजिना पाहण्यासाठी स्नोर्केलिंग, स्क्युबा डायव्हिंगच्या मुबलक संधी यांमुळे अंदमान निकोबार द्वीपसमूह लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. या द्वीपसमूहामध्ये एकूण ५७२ लहान मोठी द्वीपे असून, यातील केवळ ३६ द्वीपेच पर्यटकांसाठी खुली आहेत. या द्वीपांवर राहणारे नागरिक मुख्यत्वे दक्षिण भारतीय आणि दक्षिणपूर्वी आशियायी लोक आहेत. तसेच काही द्वीपांवर आदिवासी जमातींचेही वास्तव्य आहे. या द्वीपसमूहाला दिलेली अंदमान आणि निकोबार हे नावे वास्तविक मलाय भाषेतील आहेत. ‘अंदमान’ हा शब्द ‘हनुमान’ या अर्थी वापरण्यात आला असून, ‘निकोबार’ या शब्द तमिळ भाषेतील ‘नक्कावरम’ या शब्दावरून आला असल्याचे म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ ‘निर्वस्त्र मनुष्य’ असा आहे. बहुधा या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी जमातींना उद्देशून हे नाव पडले असावे.

अंदमान आणि निकोबार येथील स्थानिक भाषा ‘अंदमानीज’ आणि ‘निकोबारीज’ असून, येथे हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषाही बोलल्या जातात. अंदमान क्रेओल हिंदी ही येथील बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने आढळणारी भाषा आहे. या द्वीपसमूहाला सागरी वैभव लाभले असून, जगातील सर्वात मोठ्या आकाराची कासवे याच प्रांतांमध्ये पहावयास मिळतात. या ठिकाणी हॉक्सबिल, ग्रीन टर्टल, आणि लेदरबॅक या विशालकाय कासवांच्या प्रजाती पहावयास मिळतात. या द्वीपसमूहाचा भाग असलेल्या नॉर्थ सेंटीनेल आयलंड या द्वीपावर आदिवासी जमातींचे वास्तव्य असून, या द्वीपावर सुमारे तीनशे आदिवासी असल्याचे म्हटले जाते. ही आदिवासी जमात आजच्या प्रगत युगापासून वंचित आहे.

डूगॉन्ग नामक सागरी प्राणी अंदमान निकोबारचा ‘स्टेट अॅनिमल’ असून या प्राण्याला ‘एंजल ऑफ द सी’ असेही म्हटले जाते. पंडूनुस किंवा निकोबार ब्रेडफ्रूट हे निकोबारची खासियत असून, हे फळ येथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. येथील अनेक पदार्थांमध्ये या फळाचा वापर होत असून, या झाडाच्या लाकडाचा वापर बांधकामासाठी केला जात असून, या फळाच्या सालीचा वापर आंघोळीसाठी वापरण्याचा ब्रश म्हणून केला जातो. या द्वीपसमूहांवर व्यासायिक कारणांसाठी, म्हणजे मुख्यत्वे निर्यातीसाठी मासेमारी करणे कायद्याने मना आहे.

अंदमान निकोबार द्वीपसमूहातील ‘बॅरन आयलंड’ हा भारतातीलच नाही, तर समस्त दक्षिण आशियामधील एकमेव सक्रीय ज्वालामुखी आहे. अंदमान निकोबार द्वीप समूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथून हा ज्वालामुखी १३५ किलोमीटर अंतरावर असून, या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची सर्वप्रथम औपचारिक नोंद १७८७ साली झाली होती.

Leave a Comment