‘या’ वाहनांसाठी हिरव्या नंबर प्लेट, तसेच मोफत पार्किंग आणि टोलमाफी


नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री येत्या काही वर्षांत वाढावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. हिरवी नंबरप्लेट इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात आली असून टोलमध्ये त्यांना सवलत दिली जाणार आहे. केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी याबाबत देशातील सर्व राज्यांना पत्र लिहून निर्देश जारी केले आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने नंबरप्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. नंबर त्यावर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. यासंबंधी केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. नीती आयोगाने यासंदर्भात केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. यात केंद्रातील सात मंत्रालय पॉवर, रोड, हेवी इंडस्ट्रीझ यांची मदत घेतली आहे.

खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. या वाहनांना हा फायदा होण्यासाठी त्यांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची असेल. खासगी वाहनांसाठी सध्या देशात पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट असलेली वाहने आहेत. तसेच ज्या कार कंपन्यांच्या शोरूम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्यांच्यासाठी लाल रंगाची नंबरप्लेट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त संरक्षण मंत्रालयाकडून मिलिट्री वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी वेगळ्या प्रकारच्या नंबर जारी केले जातात. यासोबतच राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्या वाहनांसाठी लाल बॅकग्राउंड रजिस्ट्रेशन प्लेटसोबत राष्ट्रीय प्रतीकाचे चिन्ह लावले जाते.

Leave a Comment