मायावती-काँग्रेसच्या टक्करीत भाजपचा लाभ?


सोमवारी देशात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले असून त्यानंतर देशातील जवळपास दोन तृतीयांश मतदान पार पडेल. मतदानाचे आणखी दोन टप्पे उरले आहेत आणि ते मुख्यतः हिंदीभाषक राज्यांमध्ये आहेत. त्यातही उत्तर प्रदेशमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांचे मतदारसंघ आता मतदानाला सामोर जात आहेत. त्यामुळे मतदानाचे हे टप्पे साहजिकच चुरशीचे बनले आहेत. यातही बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेले वाग्युद्ध अधिक तीव्र झाले आहे आणि त्यामुळे निवडणुकीला रंगत आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना पंतप्रधान करणे, हे काँग्रेसचे लक्ष्य आहे तर मायावती यांना स्वतःला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. “लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहे. देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तर प्रदेशातूनच जातो आणि तिथे बसपा आणि सपाची युती आहे. त्यामुळे देशाचा पुढचा पंतप्रधान आम्हीच ठरवू,” असे रोखठोक प्रतिपादन त्यांनी गेल्या महिन्यात विदर्भात घेतलेल्या प्रचार सभेत केले होते. काँग्रेसला लक्ष्य गाठायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश हे राज्य महत्त्वाचे आहे आणि मायावती यांची तर ती कर्मभूमीच आहे. काँग्रेसने आपली मोहीम फत्ते करण्यासाठी खुद्द प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली आहे. म्हणूनच मायावतींचा प्रतिस्पर्धी असलेल्या भीमा आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला प्रियंका रुग्णालयात जाऊन भेटल्या. तसेच दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. याच कारणामुळे काँग्रेस आणि बसपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती झाली होती. त्यामुळे लोकसभेतही त्यांची युती होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र गोरखपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सप-बसपची युती झाली आणि काँग्रेसला खड्यासारखे बाजूला करण्यात आले. तीच युती सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्याची वेळ आली तेव्हाही काँग्रेसला सोबत घेण्यात आले नाही. त्याचे कारण वर उल्लेख केलेली मायावती यांची काँग्रेसवर असलेली नाराजी. महागठबंधन नावाच्या आघाडीत काँग्रेसला तसूभरही जागा देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांचा हा राग दूर करण्याऐवजी त्यात भर घालण्याचाच प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने केला. त्यामुळे आज हे दोन पक्ष समोरासमोर उभे टाकले असून त्याचा फटका काँग्रेसलाच बसण्याची शक्यता आहे. याचे कारण मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार बसपच्या पाठिंब्यावरच उभे आहे आणि गरज पडल्यास या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी मायावतींनी दिली आहे. भाजपाला हरविण्याचे सामर्थ्य फक्त सपा-बसपा महाआघाडीतच असून काँग्रेसला पाठिंबा देऊन लोकांनी आपले अमूल्य मत वाया घालवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची झोप उडणे साहजिक आहे कारण त्याचे काय गंभीर होतील, हे राजकारणात पक्के मुरलेल्या कमलनाथ यांना माहीत आहे. मायावतींशी जुळवून घेण्याचे प्रयत्न कमलनाथ करत असल्याचे सांगितले जाते कारण त्यांनी पाठिंबा काढला तर त्यांचे युतीतील भागीदार अखिलेश यादव हेही पाठिंबा काढतील आणि आधीच तकलादू पाठिंब्यावर उभे असलेले कमलनाथ यांचे सरकार कोसळू शकते.

या सगळ्याला निमित्त झाले ते काँग्रेसने गुना मतदारसंघातील मायावती यांचे उमेदवार पळविल्याचे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकेंद्रसिंग राजपूत यांना आपल्याकडे वळविले आणि आधीच घुश्शात असलेल्या मायावतींचा पारा आणखी चढला. या जागेवरून स्वतः सिंधिया निवडणूक लढवत आहेत आणि याच राजपूत यांच्यासाठी मायावती 4 मे रोजी गुनात एक सभा घेणार होत्या. ती त्यांना रद्द करावी लागली आणि ही त्यांच्यासाठी मोठी नामुष्की होती. ट्विटरवरून राजपूत यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून सिंधिया यांनी आगीत आणखी तेल ओतले.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मायावतींनी ट्विटरवरूनच काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही सारखेच बेभरवशाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपप्रमाणेच काँग्रेसही आपल्या सरकारचा वापर विरोधकांना घाबरवण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या लोकांनी गुना लोकसभा मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराला धमकावून माघार घ्यायला लावली असा आरोप त्यांनी ट्विटरद्वारे केला.

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार असून बसपचे दोन आमदार आहेत. त्यांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मायावतींच्या या पवित्र्याने कमलनाथ सरकार गडगडले तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. त्यामुळे फडताळाकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या मांजरासारखे भाजप या सर्व घडामोडींकडे पाहत असेल तर त्यात नवल नाही.

Leave a Comment