बाप बड़ा न भैय्या,सबसे बड़ा रुपैया!


लोकसभा निवडणुकीदरम्यान नेहमीप्रमाणे विविध प्रकारचे वाद निर्माण झाले. अनेक गोष्टींनी विशेष लक्ष वेधले. यात अक्षयकुमारने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत गाजली. मात्र त्यानंतर अक्षयकुमार मुळात भारतीय नागरिकच नाही आणि त्याने मतदान केले नाही, ही गोष्ट तर आणखीच गाजली. सेलिब्रिटींना धारेवर धरण्यासाठी टपून बसलेल्या सोशल मीडियात तर ती व्हायरल झाली. अक्षयकुमार हा नावाजलेला अभिनेता असल्यामुळे या गोष्टीची चर्चा होणे स्वाभाविक होते. देशभक्तीचे चित्रपट करून पडद्यावर देशप्रेम दाखविणारा अक्षय भारतीय नागरिक का नाही, हाही सवाल या निमित्ताने करण्यात आला.

अक्षयकुमारपुरते बोलायचे झाले तर आपण कॅनडाचे नागरिक असल्याचे कधीही लपवले नाही, हे त्याने स्पष्ट केले आहे. दिग्दर्शिका दीपा मेहता या कामागाटा मारू प्रकरणावर ऐतिहासिक चित्रपट तयार करत आहेत. यासाठी एखाद्या कॅनडाच्या नागरिकाला मुख्य भूमिका द्यावी तरच सरकारी निधी देऊ, अशी अट कॅनडाच्या सरकारने ठेवली होती. तेव्हा अक्षयकुमारच समोर आला होता.

“मी पहिल्यांदा कॅनडात गेलो होतो 1995 साली ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी. तेव्हापासून कॅनडा मला खूप आवडतो,” असे त्याने म्हटले आहे. यातील गोम अशी, की अक्षयचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा त्याला आपल्या पैशांची गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी त्याला सर्वोत्तम संधी कॅनडात दिसली. तसेच कॅनडात गुंतवणुकीवरील उत्पन्नावर भारताच्या तुलनेत कमी कर द्यावा लागतो. त्यानंतर कॅनडाने त्याला भारतातील शुभेच्छा दूत होण्याची ऑफर दिली आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याला थेट कॅनडाचे मानद नागरिकत्व देऊ केले. ती ऑफर अक्षयने स्वीकारली. भारतीय कायद्यानुसार दोन देशांचे नागरिकत्व बाळगता येत नाही, म्हणून त्याला येथील नागरिकत्व सोडावे लागणार होते. परंतु अक्षयला कॅनडा आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचा वाटला आणि म्हणून तो भारतीय नागरिकत्व सोडायला तयार झाला, असे त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र अन्य भारतीय नटांच्या तुलनेत अक्षयकुमार अधिक देशभक्तीचे चित्रपट करतो आणि समाजसेवाही करतो. भारत सरकारसोबत मिळून भारतीय हुतात्मा जवानांसाठी निधी उभारण्यासाठीही त्याने मदत केली आहे, एवढे खरे.

अक्षयच नाही तर आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्यासहित बॉलिवूडची अनेक मंडळी परदेशस्थ आहेत. ज्यांना भारताचे राष्ट्रपती करा म्हणून अधूनमधून काही जण सूर काढतात ते सुपरस्टार अमिताभ बच्चन हेही त्यातून सुटलेले नाहीत. चित्रपटांतून काही वर्षे संन्यास घेणाऱ्या बच्चन यांनी एबीसीएल नावाची कंपनी उघडली होती. व्यवसायाच्या संदर्भात ते काही काळ न्यूयॉर्कमध्ये राहिले. त्याच काळात त्यांनी अनिवासी भारतीयाचा (एनआरआय) दर्जा घेतला होता. त्यावेळी या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती आणि त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला हा दर्जा मिळतो, असे सांगून त्यांनी सफाई दिली होती. त्यांची सून ऐश्वर्या राय हिनेही आपण अनिवासी भारतीय असल्याचे सांगून प्राप्तिकर खात्याकडे सूट मागितली होती.

बॉलीवुडच्या अन्य अनेक जणांबाबत असे बोलले जाते, की त्यांनी वेगवेगळ्या कारणाने अमेरिका, कॅनडा किंवा ब्रिटनचे नागरिकत्व घेतले आहे. करण जोहर हा ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटले जाते. तसेच करिश्मा कपूर (हिचा पती संजीव कपूरकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे), उपेन पटेल, कॅट्रीना कैफ असे अनेक जण कायद्यानुसार परदेशी आहेत.

ही सर्व मंडळी भारतात लोकप्रिय आहेत आणि येथील नागरिकांच्या मदतीनेच ते स्वतःची कारकीर्द घडवतात. येथूनच नाव आणि पैसा कमावतात. मग त्यांना भारताच नागरिकत्व घेण्यास लाज का वाटते? बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारही नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, काही सकारात्मक आणि काही नकारात्मकही. परंतु प्रश्न हा आहे, की हे कलावंत येथे काय फक्त लोकप्रियता, कारकिर्द आणि पैसा कमावण्यासाठी येतात? दुर्दैवाने याचे उत्तर होय असेच आहे. भारतापेक्षा कमी कर देऊन अधिक ऐश-आरामाचे जीवन जगता येणे, हाच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. बाप बड़ा न भैय्या,सबसे बड़ा रुपैया!

Leave a Comment