ऑस्ट्रेलियातील महामार्गावर सापडला तीन डोळ्यांचा साप


ऑस्ट्रेलियातील उत्तरी प्रांतामध्ये एका महामार्गावर आढळलेल्या तीन डोळे असलेल्या एका सर्पाचे छायाचित्र ऑस्ट्रेलियन वन्य प्राणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच सोशल मिडीयावर शेअर केले आहे. ‘नॉर्दर्न टेरीटरी अँड पार्क्स’च्या वन्यप्राणी विभाग अधिकाऱ्यांनी ही छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली असून, या छायाचित्रांमधील सर्पाला तीन डोळे असल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे या सर्पाबद्द्ल जनमानसात मोठे कुतूहल निर्माण झाले असून या सर्पाची प्रसिद्ध केली गेलेली छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार कार्पेट पायथन नामक हा सर्प असून, जेव्हा हा तीन डोळे असलेला सर्प सापडला, तेव्हा त्याचे वय तीन महिन्यांचे होते. त्यानंतर काहीच काळामध्ये या सर्पाचा मृत्यू झाले असल्याचे समजते. नॉर्दर्न टेरिटरीमधील डार्विनच्या नजीक असलेल्या अर्न्हेम महामार्गावर हा सर्प वन्यप्राणी विभागाला आढळला होता. वास्तविक सर्पाला तीन डोळे असणे हे अनैसर्गिक असून, अशा अवस्थेमध्येही हा सर्प तीन महिने जिवंत राहिला असल्याचे आश्चर्य वन्यप्राणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या सर्पाला अन्न मिळविता आले नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सर्पाला असलेल्या तिसऱ्या डोळ्यानेही सर्पाला व्यवस्थित पाहता येत असून, हे एक प्रकारचे नैसर्गिक ‘जेनेटिक म्युटेशन’ असल्याचे प्राणीशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या सापाला तीन डोळे असले, तरी डोके मात्र एकच असल्याचे सर्पाच्या घेतल्या गेलेल्या एक्सरे मध्ये स्पष्ट झाले आहे. या एक्सरे मध्ये सर्पाला एकाच डोके आणि एक अतिरिक्त ‘आय सॉकेट’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्पाला बचाविण्यात आल्यानंतर त्याचे नामकरण ‘मॉन्टी’ असे करण्यात आले होते. वन्यप्राणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मॉन्टीची योग्य देखभाल केली असली, तरी त्याचे प्राण वाचविण्यात मात्र त्यांना अपयश आले. वन्यप्राणी विभागातर्फे प्रसिद्ध केल्या गेलेल्या या सर्पाच्या छायाचित्राला आठ हजारांहून अधिक ‘लाईक’ आणि तेरा हजारांहूनही अधिक ‘शेअर’ आले आहेत.

Leave a Comment