अक्षय्य तृतीयेचे असे आहे महत्व


वैशाख महिन्याला सुरुवात होते, आणि कडक उन्हाळ्याने पोळून निघालेल्या सृष्टीला वरुणाच्या आगमनाची उत्कंठा लागून राहते. स्कंद पुराणामध्ये वैशाख मास हा सर्वश्रेष्ठ महिना म्हटला गेला आहे. ज्याप्रमाणे सत्य युग हे सर्व युगांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे, वेद हे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहेत, गंगा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ मानली गेली आहे, त्याचप्रमाणे सर्व महिन्यांमध्ये वैशाख हा सर्वश्रेष्ठ महिना मानला गेला आहे. उन्हाने पोळलेल्या सृष्टीला नव्या जीवनदानाची चाहूल देणारा असा हा महिना आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. उत्तर भारतामध्ये या पर्वाला आखातीज किंवा वैशाख तीज असे ही म्हटले जाते. त्रेता आणि सत्ययुगाचा आरंभ याच दिवशी झाल्याचा उल्लेख असल्याने या पर्वाला कृतयुगादि तृतीया असे ही म्हटले जाते.

भविष्य पुरणाच्या अनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्नान, दान, जप, होमहवन, स्वाध्याय, तर्पण या विधींना खास महत्व असते. समस्त पापांचा नाश करणारी ही तिथी असून, या दिवशी सर्व सुखे संपन्न होतील अशी ही तिथी आहे. पार्वती या तिथीची अधिष्ठात्री देवता आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, या दिवशी घरामध्ये आणलेली कोणतीही नवी वस्तू, किंवा या दिवशी कुठलेही नवे काम सुरु करणे शुभ मानले गेले आहे. म्हणूनच या दिवशी लोक आवर्जून नव्या घराची खरेदी, नव्या वाहनाची खरेदी, सोनेखरेदी इत्यादी करीत असतात.

वैशाख महिन्यामध्ये शिवलिंगावर जल अर्पण करणे विशेष पुण्यदायी मानले गेले आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याचे दान करणे, पशु-पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालणे, छत्री आणि पंख्याचे दान श्रेष्ठ मानले गेले आहे. या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून समुद्र, किंवा नदीवर स्नान केले जाण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. या दिवशी केलेले गंगास्नान शुभफलदायी म्हटले जाते. शास्त्रांच्या अनुसार या दिवशी लक्ष्मी नारायणाच्या पूजनाला खास महत्व आहे. या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुले वापरली जाण्याचा प्रघात आहे. या पूजेसाठी नैवेद्य म्हणून गहू, जवस, सत्तू, खडीसाखर, इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून अर्पण केल्या जाण्याची पद्धतही अनेक ठिकाणी आहे. वैशाख महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतूला सुरुवात होत असल्याने उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचे दान या दिवशी श्रेष्ठ मानले गेले आहे.

लक्ष्मीनारायणाच्या सोबत, घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य ‘अक्षय्य’, म्हणजेच अखंड राहावे यासाठी या दिवशी शंकर-पार्वतींची पूजाही केली जाते. या दिवशी केलेल्या उपवासाला विशेष महत्व असून, या दिवशी उपवास केल्याने धन, सुख आणि संपन्नता प्राप्त होत असल्याचे शास्त्रे म्हणतात. अक्षय्य तृतीयेच्या पर्वाशी अनेक पौराणिक मान्यताही निगडित आहेत. पुराणांच्या अनुसार महाभारताचे युद्ध याच दिवशी समाप्त झाले होते. भगवान विष्णूंचे अवतार नर-नारायण, हयग्रीव आणि परशुराम हे ही याच तिथीला धरतलावर अवतरले होते, तर ब्रह्मदेवांचे पुत्र अक्षय कुमार यांचा जन्मही याच तिथीला झाल्याचे म्हटले जाते. बद्रीनाथ धामाची द्वारे याच दिवशी खुली होत असून, अक्षय्य तृतीयेपासूनचा चारधाम यात्रेला प्रारंभ होत असतो.

Leave a Comment