एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया भारतीय वायुसेनेचे नवे उपप्रमुख


एक मे २०१९ रोजी वायुसेना भवन, नवी दिल्ली येथे एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया यांनी भारतीय वायुसेनेचे नवे उपप्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतला. तत्पूर्वी उपप्रमुख असलेले एअर मार्शल अनिल खोसला तीस एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर एअरमार्शल भदुरिया यांची उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल भदुरिया हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून, भारतीय वायुसेनेमध्ये फायटर पायलट म्हणून १९८० साली ते रुजू झाले. त्यानंतरच्या कारकीर्दीमध्ये एकंदर २६ निरनिराळ्या प्रकारच्या लढाऊ आणि ट्रान्सपोर्ट विमानचालनाचा त्यांचा अनुभव मोठा आहे.

एअर मार्शल भदुरिया यांनी बांग्लादेश येथील ‘कमांड अँड स्टाफ कॉलेज’ येथून ‘मास्टर्स इन डीफेन्स स्टडीज’ ही पदवी घेतली असून, भारतीय वायुसेनेमध्ये अनेक महत्वाची पदे त्यांनी आजवर सांभाळली आहेत. एअर मार्शल भदुरिया यांनी ‘जॅग्वार’ लढाऊ विमानांच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले असून, एका मोठ्या आणि अत्यंत संवेदनशील वायुसेना बेसचे प्रमुख असण्याची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

भारतीय वायुसेनेमध्ये नुकत्याच समाविष्ट झालेल्या ‘तेजस’ या लाईट कॉम्बॅट विमानांच्या अनेक यशस्वी चाचण्या करण्यामध्येही एअर मार्शल भदुरिया यांचा सक्रीय सहभाग होता. एअर मार्शल भदुरिया यांनी मॉस्को, रशिया येथे ‘डिफेन्स अटॅशे’ म्हणूनही काम पहिले असून, उपप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते भारतीय वायुसेनेच्या ट्रेनिंग कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. एअर मार्शल भदुरिया यांना अनेक सम्मानांनी पुरस्कृत करण्यात आले असून, यामध्ये ‘चीफ ऑफ एअर स्टाफ कमेंडेशेन’, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल व वायु सेना मेडल या सम्मानांचा समावेश आहे.

Leave a Comment