नाझी भस्मासूराचा पुन्हा उदय?


नाझी जर्मनी हे जर्मनीला मिळालेले एक बदनामीकारक नाव. एक कलंक. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील म्हणजे 1933 ते 1945 पर्यंतच्या काळातील जर्मनीचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. अ‍ॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. दुसर्‍या महायुद्धात हिटलरचा पाडाव झाला आणि नाझी जर्मनीचा अस्त झाला. या काळात असंख्य ज्यु धर्मियांची हत्या करण्यात आली. जर्मनीच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणून हा काळ ओळखला जातो आणि जर्मनीवासियांमध्ये त्याबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. हिटलरच्या पाडावासोबतच नाझीवाद संपल्याचे मानले जात होते, म्हणूनच ‘नाझी भस्मासूराचा उदयास्त’सारखे पुस्तक येऊ शकले. मात्र हाच नाझीवाद आता पुन्हा डोके वर काढत असून त्यामुळे जर्मन सरकारच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत.

जर्मनीच्या पूर्व भागातील एका शहरात नवनाझी कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे हे वास्तव समोर आले आहे. बुधवारी कामगार दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यात सहभागी लोकांनी नाझी गणवेश घातले होते. त्यांच्या हातात नाझी ध्वज होते. हे सगळे पोलिसांच्या देखत झाले त्यामुळे देशातील एका अग्रगण्य यहुदी संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.

या मोर्चाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जर्मनीत मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त झाला. ज्या सॅक्सोनी राज्यात ही घटना घडली तेथे अधिकाऱ्यांनी कारवाई करावी यासाठी मागणी होत आहे. या राज्यात उजव्या गटाचे कार्यकर्ते जास्त सक्रिय आहेत.

“प्लाऊन शहरात दि थर्ड वे या पक्षाने काढलेल्या मोर्चाची छायाचित्रे अस्वस्थ करणारी आणि भितीदायक आहेत,” असे जर्मनीच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ ज्यूजचे अध्यक्ष जोसेफ शूस्टर यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे योम हाशोआह या दिवसाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा काढण्यात आला. यहुदी लोक हा दिवस नाझींकडून मारण्यात आलेल्या 60 लाख यहुदी लोकांच्या स्मरणार्थ पाळतात. यामुळे जर्मन इतिहासातील सर्वात काळ्याकुट्ट अध्यायाची परत आठवण झाल्याचे त्यांनी सांगितले. याच दिवशी पश्चिम जर्मनीतील ड्युईसबर्ग येथेही एक मोर्चा काढण्यात आला.तेथे निदर्शकांनी इस्राएलच्या विध्वंसाची घोषणा करणारे फलक मिरविले होते.

दि थर्ड वे हा एक तुलनेने छोटा पक्ष असून अतिउजव्या गटाच्या अतिरेक्यांशी त्याचा जवळचा संबंध आहे, असे जर्मन सुरक्षा संस्थांचे म्हणणे आहे. प्लाऊनमधील मोर्चांमध्ये मोठमोठ्या ढोलांचा वापर करण्यात आला. हिटलरच्या काळातील मोर्चांमध्ये त्यांचा वापर करण्यात येत असे. यात शेकडो लोक सहभागी झाल्याचे सॅक्सोनी पोलिसांचे म्हणणे असून या सहभागींनी “गुन्हेगार परदेशी निघून जा!” आणि ” नॅशनल सोशलिझम आता” अशा घोषणाही दिल्या.

पोलिसांनी या मोर्चात बेकायदेशीररीत्या चेहरा झाकल्याबद्दल नऊ जणांची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. तसेच या रॅलीत हिंसाचार झाला नाही, हेच पोलिसांचे यश असल्याचेही सांगितले आहे. मात्र हा मोर्चाच काढण्याची परवानगी अधिकाऱ्यांनी देता कामा नये, असे यहुदी संघटनांचे म्हणणे आहे.

जर्मन सरकारही या घडामोडीने चिंतित झाले असून उजव्या विचारांच्या अतिरेक्यांविरोधात कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. “आम्हाला अशी छायाचित्रे पाहण्याची बिल्कुल इच्छा नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि उजव्या अतिरेक्यांशी लढण्यासाठी मुक्त व लोकशाही राज्यामध्ये जे शक्य आहे ते सर्व आम्ही करणार आहोत, यात काही शंका नाही,” असे जर्मनीचे गृहमंत्री होर्स्ट सीहोफर यांनी सांगितले. देशातील अतिरेकी दहशतवादाची क्षमता कमी असल्याचे मानण्याबाबत परराष्ट्रमंत्री हिको मास यांनी इशारा दिला आहे. ही एक धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सॅक्सोनी राज्यात अतिउजव्या अतिरेक्यांची संख्या दीर्घकाळापासून मोठी आहे, परंतु नाझी विचारसरणी या राज्यापुरती मर्यादित नाही. जर्मनीमध्ये अंदाजे 24,000 अतिउजवे अतिरेकी आहेत आणि त्यांच्यातील अर्धे जण हिंसा करण्यास सज्ज असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी अॅडॉल्फ हिटलरच्या वाढदिवसानिमित्त फ्रँकफूर्टजवळील इंगेलहाईम या शहरात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या रॅलीत केवळ 20 जण आल्यामुळे तिचा फज्जा उडाला. मात्र अशी रॅली आयोजित होणे हीच एक मोठी गोष्ट होती. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात न्यूरेम्बर्ग येथे नवनाझींनी मशाल मोर्चा आयोजित केला होता.

जर्मनीत मोठ्या प्रमाणावर शरणार्थ्यांना आसरा दिल्यामुळे राष्ट्रवादाचा प्रभाव वाढत आहे आणि हे मोर्चे व निदर्शने ही त्याचीच परिणती असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. याची परिणती हिंसेत होऊ नये आणि पुन्हा नाझी काळ परतू नये, हेच जर्मनीपुढेच आव्हान आहे.

Leave a Comment