युतीच्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते श्रेष्ठ!


लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले असले, तरी त्यांच्यातील संबंध सुरळीत होण्याचे नाव घेत नाहीत. दोन्ही पक्षांनी गेली पाच वर्षे एकमेकांना बोचकारे काढून आणि प्रसंगी हल्ला करून घायाळ केले आहे. या जखमांची खपली काढण्यासाठी छोटेसे निमित्तही पुरेसे ठरू शकते. औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते व मावळते खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात केलेल्या तक्रार करून या वास्तवावर शिक्कामोर्तबच केले आहे. खैरे यांनी खपली काढली आहे आणि त्याच्या वेदना दोन्ही पक्षांना दीर्घकाळ सहन कराव्या लागतील.

आपल्या मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युती केली. मात्र ही युती प्रामुख्याने पक्ष नेतृत्वापुरतीच राहिली की काय, अशी शंका येण्याजोगी स्थिती आहे. ऑक्टोबर 2014 पासून आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभ्या टाकलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात मनोमिलन होणे तसे अवघडच आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी परस्परांच्या विरोधात यथेच्छ गालिप्रदान करून घेतले आहे. युतीतील नाराजीची ही खदखद मतदान पार पडेपर्यंत दबून राहिली, परंतु ती आता बाहेर पडू लागली आहे.

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याविरोधात थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. दानवे यांनी आपले जावई हर्षवर्धन जाधव यांना खैरे यांच्या विरोधात मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सुभाष पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव हे प्रमुख उमेदवार होते. हर्षवर्धन हे दानवे यांचे जावई आहेत. मराठवाड्यातील सर्वात चुरशीच्या लढतींपैकी ही लढत मानली गेली.

या निवडणुकीत दानवे यांनी सेनेला मदत न करता जावई हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, असा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे दानवे यांनी युतीधर्माचे पालन केलेले नाही. नातीगोती जपण्यासाठी दानवे यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे ते म्हणाले.

खैरे यांच्या या पत्रबॉम्बनंतर, विशेषतः त्याची व्याप्ती थेट अमित शाह यांच्यापर्यंत गेल्यामुळे, भाजपलाही पुढे येऊन खेळावे लागले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा व दानवे यांचा बचाव केला. “खैरे यांच्या विजयासाठी भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि युतीधर्माचे पालन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेवरून आपण स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करून खैरे यांच्या विजयासाठी भाजपा नेते – कार्यकर्त्यांशी संपर्क केला आणि पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केले,” असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात औरंगाबादमध्ये रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामुळे जालना मतदारसंघासाठीही त्यांना फार वेळ देता आला नाही. औरंगाबादमध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना निवडणूक प्रचार किंवा भेटीगाठी करता आल्या नाहीत, असे ठाकूर यांनी सांगितले.

जी गत औरंगाबादेत तीच गत जालन्यातही होती. जालन्यात शिवसैनिकांनी दानवे यांच्या विजयासाठी किती प्रयत्न केले, हे गुलदस्त्यातच आहे. दानवे यांचा पराभव करणारच हा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हट्टच धरला होता. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर ते प्रचारात सामील झाले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यासाठी मध्यस्थी करावी लागली होती. मात्र जालन्यात शिवसैनिकांना प्रचारासाठी तयार करताना दानवे यांची चांगलीच तारांबळ उडाली होती, हे सर्वांना माहीत आहे. दानवे आणि खोतकर यांच्यातील सख्य एवढे, की शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीनंतर रावसाहेब दानवेंना मातोश्री प्रवेश रोखला असे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगितले होते.

आता हे भांडण केवळ गाऱ्हाण्यापुरते आहे. मात्र निवडणूक निकालात या जागांवर काही दगाफटका झाला तर दोन्ही पक्षांतील कटुता आणि अविश्वास आणखी वाटेल. त्याचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीतही पडतील.

थोडक्यात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी प्रमाणेच ही युतीही वैयक्तिक हितसंबंध आणि नात्यागोत्यांच्या हिशेबांवरच उभी आहे. युतीच्या नात्यापेक्षा रक्ताची नाती श्रेष्ठ ठरतात!

Leave a Comment