बुरखा है बुरखा – ही तर शिवसेनेची जित्याची खोड!


संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्यावर बंदी आणा अशी मागणी करून शिवसेनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. निवडणुकीची रणधुमाळी राज्यापुरती का होईना शमली असतानाच एक नवा बॉम्ब बुरखाबंदीच्या मागणीवरून शिवसेनेने टाकला आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा धुरळाही उडाला. या मागणीला अन्य कुठून नव्हे, तर खुद्द शिवसेनेतूनही विरोध झाला. मात्र शिवसेनेच्या लक्ष्यावर हा बाण बरोबर लागला.

सेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात श्रीलंका सरकारप्रमाणेच भारतातही राष्ट्रीय सुरक्षेसाठी बुरखाबंदी करावी, असा विचार मांडण्यात आला. मात्र, ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडण्यात आलेली भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे पक्षाच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.त्यावरुन ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत व त्यांच्यात ट्विटरवरून वादावादीही झाली. किमान महिला नेत्यांनी तरी बुरख्याचे समर्थन करु नये, अशी भूमिका खा. राऊत यांनी मांडली. त्यामुळे बुरखाबंदीवरुन शिवसेनेतील दोन दिग्गज नेतेच आमने सामने आल्याचे दिसून आले.

खरे तर बुरख्यावरील राजकारण हे तसे नाममात्रच. श्रीलंका हा सार्वभौम देश आहे आणि तेथील सरकारने तो निर्णय घेतला आहे. त्यासाठी 300 जणांच्या मृत्यूचे अगदी ठोस कारण त्यांच्याकडे आहे. नकाब किंवा बुरख्यावर बंदी घालण्याचे श्रीलंकेने ठरविले असेल तर ते त्यांच्यापुरते ठीक आहे. मात्र त्यावरून शिवसेनेने भारतातही बुरख्यावर सरसकट बंदीची मागणी करावी, हे जरा जास्तच होते. त्यासाठी रावणाची लंका आणि रामाचा भारत असा संबंध जोडणे हे खास शिवसेना शैलीत बसणारे होते.

दहशतवाद हा एक रोग आहे आणि तो वाढतच आहे. जेव्हा हे दहशतवादी आपल्या लक्ष्याचा माग घेत असतात किंवा आपल्या निर्घृण कारवाया पार पाडत असतात तेव्हा खासकरून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे निनावी राहणे हे दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडणारे असते. त्यावेळी बुरखा हा दहशतवादी कारवाईपूर्वी आणि नंतर निसटण्यासाठी कुठल्याही व्यक्तीसाठी कदाचित सर्वात चांगले आवरण असते. मात्र जेव्हा दहशतवादी पोटाला स्फोटकांचा पट्टा बांधून येतो तेव्हा हा बुरखा त्याच्यासाठी फारसा महत्त्वाचा नसतो. अर्थातच अशा वेळी नकाब घालण्या न घालण्याने काही फरक पडत नाही. फिदायीन अतिरेकी आपला चेहरा उघडा ठेवूनही स्फोट घडवून आणू शकतो. राजीव गांधींची हत्या करणाऱ्या आत्मघातकी मारेकऱ्याकडे कुठे नकाब किंवा बुरखा होता? धनू नावाच्या त्या महिलेचा चेहरा सर्वांनी पाहिला, अगदी छायाचित्रातही तो कैद झाला मात्र तिच्या पोटाशी बांधलेल्या पट्ट्याची कोणाला खबरही लागली नाही.

वास्तविक शिवसेनेला बुरख्याशी फारसे काही देणे-घेणे नाहीच. त्यांचे लक्ष्य आहे ते भाजप. अर्धी-अधिक निवडणूक संपली असली तरी महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांतील मतदान अद्याप व्हायचे आहे. या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे आणि भाजपच्या विरोधात अद्यापही त्यांची भूमिका निश्चित नाही. वाराणसीत मोदीच निवडून येणार परंतु त्यांच्या विरोधात मतदान करायचे का नाही, हे अद्याप ठरलेले नाही असे मुस्लिम मतदार सांगत असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात बहुतेक सर्व माध्यमांनी दिले होते. त्याचा अर्थच हा होता.

बुरख्याच्या निमित्ताने भाजपला कारवाई करण्यास प्रवृत्त करावे आणि मतदारांचे ध्रुवीकरण घडवून आणावी, हा शिवसेनेचा मूळ उद्देश. भाजपची याला संमती मिळाल्यास मुस्लिमांचे उघड ध्रुवीकरण आणि नाही मिळाल्यास कट्टर हिंदू भाजपच्या विरोधात जाणार, असा शिवसेनेचा होरा असावा. येनकेनप्रकारेण केंद्रात सहकारी पक्षावर अवलंबून असलेले सरकार यावे आणि शक्यतो नितीन गडकरी पंतप्रधानपदी असावेत, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा सगळा प्रपंच! परंतु स्वपक्षातच त्यावरून मतभेद झाल्यामुळे ते पेल्यातील वादळ ठरले.

गेली पाच वर्षे भाजपच्या बरोबरीने वावरूनही भाजपच्या पायात पाय अडकविण्याचा जो उद्योग शिवसेनेने केला, त्याचीच ही पुढची आवृत्ती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती केली तरी शिवसेनेची ती सवय गेली नाही. फक्त भाजपला उघड अपशकुन करण्याऐवजी पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची ही पद्धत आहे.

गेली पाच वर्षे अंगात भिनलेली शिवसेनेची ही जित्याची खोड आहे. ती सहजासहजी जाणार नाही!

Leave a Comment