सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकताच आपला एकतिसावा वाढदिवस साजरा केला. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापासून अनुष्काने तिच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये अनुष्का शाहरुख खान सोबत दिसली होती. त्यानंतर अनुष्काने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. गेल्या वर्षी पार पडलेला अनुष्का आणि विराटचा विवाहसोहोळा सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरला होता. अनुष्का तिच्या अभिनयाशिवाय ट्रेंडी फॅशन आणि फिटनेससाठी ही ओळखली जाते. स्वतःला नेहमी फिट आणि सक्रीय ठेवण्यासाठी अनुष्का योग्य आहार आणि अर्थातच व्यायाम यांचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळते. अनुष्का स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करते हे जाणून घेऊ या.
अनुष्का शाकाहारी असली तरी अंड्यांचे सेवन करते. मांसाहाराचे सेवन मात्र अनुष्का करीत नाही. अनुष्काच्या आग्रहाखातर आता विराटने ही मांसाहाराचा त्याग केला असून, त्यानेही शाकाहारी आहारपद्धती स्वीकारली आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये अनुष्का दोन ‘एग व्हाईट’ म्हणजेच दोन अंड्यातील पांढरे बलक घेणे पसंत करते. त्याशिवाय ताज्या फळांचा रस, किंवा फळे अनुष्काच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून समाविष्ट असतात. अनुष्काला घरी बनविलेले साधे भोजन अधिक प्रिय असून, बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेणे तिला तितके आवडत नाही. बाहेर खाण्याची वेळ आलीच तर अनुष्का पदार्थांची निवड काळजीपूर्वक करते. एरव्ही घरचे भोजन आवडणाऱ्या अनुष्काच्या दुपारच्या भोजनामध्ये डाळ, पोळी आणि भाजी या पदार्थांचा समावेश असतो. दिवसभर कामामध्ये गुंतलेली असूनही अनुष्का दिवसातून अनेकदा थोडे फार ‘हेल्दी स्नॅक्स’ खाणे पसंत करते. त्याशिवाय त्वचेची आर्द्रता टिकून राहावी या करिता अनुष्का वारंवार लिंबूपाणी किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करीत असते. रात्रीच्या भोजनामध्ये अनुष्काला घरचेच जेवण आवडते. रात्रीच्या भोजनानंतर झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधाचे सेवन अनुष्का करते. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड पासून अनुष्का लांबच राहणे पसंत करते.
फिटनेससाठी अनुष्का नियमित योगाभ्यास करते. त्याशिवाय वेट ट्रेनिंगचे व्यायामप्रकारही तिच्या फिटनेस रुटीनमध्ये समाविष्ट असतात. नृत्य हा देखील एक सर्वांगीण व्यायाम असल्याचे अनुष्काचे मत असल्याने बॉलीवूडमधील गाण्यांवर नृत्य करणे ही तिला आवडते. नृत्य केल्याने शरीरावरला आणि मेंदुवरला ताण कमी होत असल्याचे अनुष्का म्हणते. योग्य आहार आणि व्यायाम यांच्यासोबत योग्य प्रमाणात विश्रांतीही आवश्यक असल्याचे अनुष्का म्हणते.