फेसबुकची स्वच्छता मोहीम – थोडा है, थोडे की जरूरत है


सोशल मीडिया संकेतस्थळांमधील अग्रणी असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन संकेतस्थळांवर आता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. संकेतस्थळाने इस्लामी नेते लुई फर्राखान, उजव्या विचारसरणीचा व्याख्याता अॅलेक्स जोन्स आणि इन्फोवार्स कंपनीच्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्यासोबतच पॉल नेहलेन, मिलो याओनोपोलोस, पॉल जोसेफ वॉटसन आणि लॉरा लूमर या प्रसिद्ध व्यक्तींचीही खाती संकेतस्थळावरून काढून टाकण्यात येणार आहेत.

“एखाद्याच्या विचारसरणीची पर्वा न करता आम्ही नेहमीच हिंसा किंवा द्वेष पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात कारवाई केली आहे,” असे फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेसबुकने जोन्स आणि इन्फोवार्स कंपनीला ऑगस्ट 2018 मध्ये फेसबुकवर प्रतिबंधित केले होते, मात्र त्यांना इन्स्टाग्रामवर खाती चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. या वर्षीच्या मार्च महिन्यात कंपनीने श्वेत राष्ट्रवाद आणि श्वेत विभाजनवादाची प्रशंसा, समर्थन आणि प्रतिनिधित्व करण्याला मनाई करण्याची घोषणा केली होती. “ज्या व्यक्ती आणि संघटना घृणा पसरवतात किंवा हल्ला करतात किंवा इतरांच्या बहिष्काराची भाषा करतात त्यांना फेसबुकवर स्थान नाही,” असे फेसबुकच्या एका प्रवक्त्याने ताज्या कारवाईच्या संदर्भात सांगितले.

फर्राखान हे नेशन ऑफ इस्लाम या संघटनेचे प्रमुख असून ते बंदी घातलेल्या व्यक्तींपैकी सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. ज्यूविरोधी आणि कृष्णवंशियांच्या वर्चस्वाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते कुख्यात आहेत. तर जोन्स याला मुख्यतः कारस्थान सिद्धांतवादी (कन्सापयरी थेअरिस्ट) म्हणून ओळखले जाते. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला हा अमेरिकेचेच कारस्थान असल्याचा सिद्धांत त्याने मांडला असून त्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. बंदी घालण्यात आलेल्या अन्य लोकांपैकी मिलो यियानोपोलॉस हा एक उच्चभ्रू चिथावणीखोर वक्ता आहे. पॉल नेहेलेन हा एक राजकारणी असून त्याने अमेरिकी संसदेची निवडणूकही लढवली आहे. तो श्वेतवर्णियांच्या वर्चस्वाचे प्रतिपादन करतो. जोसेफ वाटसन आणि लॉरा लूमर हेही कारस्थान सिद्धांतवादी आहेत.

फेसबुकच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे. “फेसबुकची आजची घोषणा ही योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,” असे मीडिया मॅटर्स फॉर अमेरिका या स्वयंसेवी संस्थेच्या उपसंचालक क्रिस्टीना लोपेझ जी. यांनी म्हटले आहे. यामुळे कट्टरवादी आणि हिंसक विचारांचा प्रसार होण्यास आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अशाच प्रकारे द्वेष आणि हिंसा पसरविल्याबद्दल गेल्या महिन्यात फेसबुकने ब्रिटनमधील अनेक गटांवर बंदी घातली होती. यात इंग्लिश डिफेन्स लीग, नाईट्स टेम्पलर टरनॅशनल, ब्रिटन फर्स्ट, द ब्रिटिश नॅशनल पार्टी (बीएनपी) आणि नॅशनल फ्रंट यांचा समावेश आहे. माजी बीएनपी नेते निक ग्रिफिन आणि ब्रिटन फर्स्टचे नेते पॉल गोल्डिंग आणि जेडा फ्रॅन्सेन यांच्यावर त्या कारवाईच्या धडाक्यात बंदी घालण्यात आली होती.

आता प्रश्न असा आहे की एवढ्याने पुरेसे होणार आहे का? घृणा आणि हिंसाचाराने भरलेल्या साहित्यावर पुरेसे निर्बंध न लादल्याबद्दल फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने टीका होत असते. तसेच सर्व प्रकारच्या दृष्टिकोनांना पुरेसा वेळ न दिल्याबद्दलही त्यांना धारेवर धरण्यात येते. उजव्या विचारसरणीच्या दृष्टिकोनाबाबत भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार दस्तुरखद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यावरून परिस्थितीची कल्पना येऊ शकते. खासकरून फेसबुक व व्हॉटस्अपवरून लोकांमध्ये द्वेष, भीती पसरवणे, भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे पुढे आले आहेत. म्यानमारपासून श्रीलंकेपर्यंत अनेक देशांमध्ये फेसबुकवरील खोट्या माहितीच्या आधारे हिंसाचार घडविल्याची उदाहरणे आहेत. संपूर्ण जगभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी सोशल मीडिया हे एक मोठे आव्हान ठरले आहे. खोटे प्रसार पसरवण्यासाठी, हिंसाचार उत्तेजित करण्यासाठी आणि विभाजनात्मक अजेंडाचा पाठपुरावा करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जातो. या सर्वांमध्ये मोठा भाऊ म्हणून अर्थातच फेसकच्या माथी जास्तीत जास्त दोष जातो.

त्यामुळे जगभरातील सरकारांकडून या संदर्भात फेसबुकवर दबाव वाढत असतानाच मुक्त अभिव्यक्तीसाठीही फेसबुकला टिकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे द्वेषपूर्ण साहित्य शोधून ते काढून टाकण्यासाठी मशीन शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधने वापरण्याचाही प्रयत्न फेसबुकने केला आहे. मात्र ते पुरेसे नाही, अशी तक्रार करणारे आहेतच!

Leave a Comment