धुळे – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. याचाच अर्थ असा होतो की त्यांना पराभवाची चाहुल लागली असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले धुळ्यात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पराभवाची चाहूल लागल्यानेच पवार घेत आहेत ईव्हीएमवर शंका
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीच्या जागेवरून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. आठवले यांनी त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्यावर टीका केली. तसेच गडचिरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही चुकीची असून त्यांनी सरकारच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले.
दरम्यान, आरपीआयला आगामी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा मिळायला हव्यात, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. तसेच आम्हालाच वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.