तृणमूल काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंबा!


सतराव्या लोकसभेची निवडणूक सुरू होण्याआधी आणि सुरू असतानाही एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत शंका घेण्यात येत नाही. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारात दररोज अशी एखादी तरी तक्रार पोचते. ही तक्रार घेऊन जाणाऱ्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र याच तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत निवडणुकीच्या नावावर जो हैदोस घालण्यात आला त्यामुळे भारताची लोकशाही लज्जित झाली आहे. ज्यांना आपल्या राज्यात हिंसामुक्त मतदानाची सुनिश्चिती करता येत नाही त्यांनी ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडणे म्हणजे कमाल आहे.

ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनीच लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणला, लोकांना मते पाडण्यापासून वंचित ठेवले आणि बळजबरी करून बोगस मते टाकली ते धक्कादायक आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यापासूनच राज्यात हिंसाचाराची नोंद झाली आहे. सत्ताधारी पक्ष वगळता बाकी सर्व पक्षांच्या उमेदवारांना या हिंसाचाराची झळ पोचली आहे.

खरे तर हा भयानक प्रकार समोर आणल्याबद्दल वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. ऐन मतदानाच्या दिवशी पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये स्थानिक प्रशासन कसे जवळजवळ संपुष्टात आले होते, हे या कॅमेऱ्यांनी देशाच्या जनतेसमोर पोचवले. एका केंद्रीय मंत्र्याच्या वाहनाची मोडतोड करण्यापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या गुंडांची मजल गेली. स्थानिक कर्मचाऱ्यांचीही या गुंडाराजला फूस होती. त्यांना प्रश्न विचारणाऱ्या अर्थात टीव्ही न्यूज चॅनेल्सच्या वार्ताहरांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्या उपकरणांचे नुकसान करण्यात आले. सोशल मीडियावर या संदर्भात भरपूर पुरावा उपलब्ध असून निवडणूक आयोग त्याची यथावकाश दखल घेईलच. अशी कारवाई झाली नाही, तर पश्चिम बंगालमधील निवडणुकीला काही अर्थच उरणार नाही. हे सर्व होत असताना ममता बॅनर्जी यांनी वारंवार ईव्हीएममध्ये गडबड केली असल्याच्या आरोपाची सरबत्ती करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होत.

अर्थात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार होण्याची ही पहिली वेळ नाही. राज्यात गेल्या वर्षी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी उसळलेला हिंसाचार हा त्याच जातकुळातील होता. त्या हिंसाचारात 13 जणांचा बळी गेला होता, तर शेकडो जण जखमी झाले होते. त्यावेळी तृणमूलची गुंडगिरी एवढी जबरदस्त होती, की राज्यात 34 टक्के जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. म्हणजे तृणमूलच्या उमेदवाराच्या विरोधात कोणीही उभे राहायलाच तयार नव्हते किंवा त्यांना उभे राहू दिले नव्हते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशिवाय मार्क्सवादी साम्यवादी पक्ष (माकप), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे अन्य तीन पक्ष राज्यात अस्तित्वात आहेत. तरीही ही वेळ! या तिन्ही विरोधी पक्षांनी या हिंसाचाराला ‘तृणमूल काँग्रेसचा आतंकवाद’ असे घोषित केले आहे.

माकप आज राज्यात क्षीण झाली आहे, अगदी गलितगात्र झाली आहे आणि त्या तुलनेत तृणमूलचे कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मतदान बळकावणे, बॉम्ब फेकणे, धमक्या देणे, मारहाण करणे या आता नित्याच्या घटना बनल्या आहेत.

ममता बॅनर्जींच्या महत्त्वाकांक्षेने या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप जीवाचे रान करत आहे, तर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी धडपडत आहेत. भाजपविरोधी आघाडी झाल्यास पंतप्रधानपदाची स्वप्ने त्यांना पडत आहेत. त्यामुळे हिंसाचारात घट होण्याऐवजी वाढच होताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये माकपची सुमारे तीन दशके सत्ता होती. ती उलथवण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यासाठी जीवाची बाजी लावली. विरोधी पक्षात असतांना ममता डाव्या पक्षांवर गुंडगिरीला आश्रय दिल्याचा आरोप करत असत. मात्र माकपवर ज्या गुंडगिरी व दहशतवादाचा आरोप तृणमूल काँग्रेस करत होती, तोच कित्ता आज तृणमूल गिरवत आहे, हे आणखी धक्कादायक आहे. ‘पोरिबर्तन’ (परिवर्तन) ही घोषणा करून

ममता बॅनर्जींनी नागरिकांकडे सत्ता मागितली होती. ती सत्ता मिळून जनतेने त्यांना दुसऱ्यांदा कौल दिला. मात्र ते परिवर्तन राहिले एकीकडे, परंतु अस्थिरता आणि हिंसाचार हेच लोकांच्या वाटेला आले आहेत. भीक नको पण कुत्रा आवर अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. ममता बॅनर्जींनी याचा गांभीर्याने विचार करून आपल्या मूळ मार्गावर यावे, यातच राजकीय शहाणपण सामावलेले आहे, अन्य़था माकपच्या मार्गावरून जाण्यास त्यांना वेळ लागणार नाही.

Leave a Comment