थायलंडमधील थरारनाट्य आता वेबसिरीजच्या रूपात नेटफ्लिक्सवर दिसणार


२०१८ सालच्या जून २३च्या दिवशीची ही हकीकत आहे. थायलंडमधील चीयांग राय प्रांतामधील लुआंग नांग नॉन नामक गुहेमध्ये अकरा ते सोळा वयोगटातील बारा तरुण फुटबॉलपटू आपल्या पंचवीस वर्षीय प्रशिक्षकासह सहजच फिरता फिरता शिरले खरे, पण तिथून पुढे आपल्यापुढे काय दिव्य वाढून ठेवले आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. ही सर्व मंडळी फुटबॉलचा सराव संपल्यानंतर सहजच या गुहेमध्ये शिरली. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली, आणि पाहता पाहता पावसाचे पाणी गुहेमध्ये शिरू लागले. पावसाचे पाणी या गुहेमध्ये शिरू लागल्याने गुहेमधील या मुलांना बाहेर पडता येणे अशक्य होऊन बसले. ही सर्व मंडळी अठरा दिवस या गुहेमध्ये अडकून पडली असून, त्यांना वाचविण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात होते. या थरारनाट्याचे थेट प्रक्षेपण केवळ थायलंड मधेच नाही, तर सर्व जगभर पाहिले जात होते.

दोन जुलै रोजी या बचावकार्याच्या अंतर्गत गुहेमध्ये उतरलेल्या ब्रिटीश डायव्हर्सना सर्व मुले आणि त्यांचा प्रशिक्षक सुरक्षित असून, एका मोठ्या खडकावर सर्व जण बसून राहिले असल्याचे दिसून आले. त्यानंतर गुहेमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोठमोठ्या पंप्सची मदत घेण्यात आली. पुन्हा अखंड पाऊस कोसळू लागण्यापूर्वी या सर्व मंडळींना सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते. अखेरीस सातत्याने एक आठवडाभर गुहेमध्ये शिरलेले पाणी पंपांच्या मदतीने बाहेर काढले गेल्यानंतर या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

ही आपदा उद्भविल्यानंतर केल्या गेलेल्या बचावकार्यामध्ये दहा हजार लोकांचा सहभाग होता. यामध्ये १०० डायव्हर्स, रेस्क्यू वर्कर्स, सरकारी संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस कर्मी, आणि सैन्य दलातील दोन हजार जवानांची मदत लाखमोलाची ठरली. या कामी दहा हेलिकॉप्टर, सात पोलिस रुग्णवाहिका, सातशे डायव्हिंग सिलेंडर्स, आणि सुमारे एक बिलियन लिटर पाणी खेचून काढण्याची क्षमता असलेले पंप्स इत्यादी उपकरणे उपयोगात आणली गेली होती. सुमारे अठरा दिवस सुरु असलेले हे थरारनाट्य अखेर संपुष्टात आले. याच थरारनाट्याचे सादरीकारण आता वेबसिरीजच्या रूपामध्ये होत असून, ही वेबसिरीज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित केली जाणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शन जॉन एम चू आणि नातावूत ‘बाझ’ पूनपिरीया करणार आहेत. या घटनेवर आधारित दोन पुस्तके या अगोदरच प्रकाशित झाली असून, या घटनेवर आधारित ‘ द केव्ह’ नामक चित्रपटाचे चित्रीकरणही नुकतेच पूर्ण झाले आहे.

या घटनेने केवळ थायलंड मधील लोकच नाही, तर ही घटना पाहत असणारे सर्वच जण एका अनामिक भावनेमध्ये बांधले गेले होते. जे लोक या गुहेमध्ये अडकले आहेत, ते सर्वजण सुखरूप बाहेर पडू दे या भावनेने अनेक लोक एकत्र आले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांच्या परिणामस्वरूप गुहेमध्ये अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका होऊ शकली. नेमकी हीच भावना आपल्याला या वेबसिरीजच्या माध्यमातून व्यक्त करावयाची असल्याचे या वेबसिरीजच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment