असा आहे ‘धक-धक गर्ल’ माधुरीचा फिटनेस मंत्रा


अभिनेत्री माधुरी दीक्षितने स्वतःच्या अभिनयक्षमतेच्या आणि नृत्यकलेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. किंबहुना एक काळ असा होता, की प्रत्येक तरुणीला आपण माधुरी इतकेच सुंदर दिसावे असे वाटत असे. आज वयाची पन्नाशी माधुरीने ओलांडली असली, तरी तिची लोकप्रियता पूर्वीइतकीच टिकून आहे. आजही पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसणाऱ्या माधुरीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा जराही दिसत नाहीत. याचे श्रेय अर्थातच तिच्या फिटनेस रुटीनला जाते. मोठी सेलिब्रिटी असणारी माधुरी एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि आईही आहे. या सर्व जबाबदाऱ्या आणि सेलिब्रिटी असल्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यातील समन्वय साधताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणे महत्वाचे असल्याचे माधुरी म्हणते.

त्वचेचे आरोग्य माधुरीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून, ते जपण्याकरिता माधुरी दररोज सकाळी ताजे नारळाचे पाणी सेवन करते. त्यानंतर सकाळच्या नाश्त्यासाठी माधुरी पोहे, उपमा, ओट्स किंवा डोसा घेणे पसंत करते. अनेकदा कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे माधुरीला रात्रीच्या भोजनाला फाटा द्यावा लागत असला, तरी दुपारचे भोजन मात्र माधुरी कधीही टाळत नाही. दुपारच्या भोजनामध्ये माधुरी भात, एखाद्या भाजीचे कालवण आणि भरपूर ताजे सॅलड खाणे पसंत करते. तिच्या दुपारच्या भोजनामध्ये ताज्या ताकाचाही समावेश असतो. रात्रीच्या भोजनासाठी माधुरी हलका आहार घेणे पसंत करते. रात्रीच्या वेळी तिच्या भोजनामध्ये सूप, किंवा मोडवून शिजविलेली कडधान्ये, किंवा दही आणि पोळी यांपैकी कोणत्या तरी एका पदार्थाचा समावेश असतो. दिवसातून सहा वेळा थोडे थोडे भोजन घेण्याची सवय माधुरीने आत्मसात केली आहे. ती भोजनामध्ये घेत असलेले पदार्थ ‘लो-कार्ब’ आणि ‘हाय-प्रोटीन’ असणारे आहेत.

माधुरी एक उत्तम नर्तकी आहे हे आपणा सर्वांना माहिती आहेच, पण नृत्य हा माधुरीच्या फिटनेस रुटीनचा ही एक भाग असल्याचे माधुरी सांगते. सर्वच नृत्य प्रकार हा एक उत्तम व्यायाम असून, यामुळे शरीर लवचिक आणि बळकट राहत असल्याचे माधुरी म्हणते. त्याचबरोबर पिलाटीस सारखे व्यायामप्रकारही माधुरीच्या आवडीचे आहेत. त्यासोबत वेट ट्रेनिंग, कार्डियो आणि योग हे तीनही व्यायामप्रकार माधुरीच्या वर्कआउट रुटीनमध्ये समाविष्ट आहेत. त्वचेच्या आरोग्याकरिता आणि शरीराची पचनक्रिया आणि चयापचय शक्ती उत्तम राहावी या करिता माधुरी दिवसात किमान आठ ग्लास पाण्याचे सेवन करते, तसेच तिच्या आहारातून चहा, कॉफी किंवा इतर कॅफीन युक्त पेये तिने वर्ज्य केली आहेत. त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता उत्तम सनस्क्रीनचा वापर कराणे आवश्यक असल्याचे माधुरी सांगते.

एखाद्या शोमध्ये सहभागी होत असताना मेकअप सोबतच हेअर स्टायलिंग ओघाने येतेच. अशा वेळी केशभूषा करण्यासाठी केसांवर विविध प्रसाधनांचा वापर केला जातो. या प्रसाधनांचे दुष्परिणाम केसांवर होऊ नयेत यासाठी माधुरी आपल्या केसांना तेलाने नियमित मालिश करते, तसेच दह्याचा वापर ही केसांसाठी करते. त्वचा, केस आणि शरीराचे एकंदर आरोग्य उत्तम राहण्यासाठी उत्तम आणि संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित झोप अतिशय आवश्यक असल्याचे माधुरी म्हणते. त्यामुळे रात्रीच्या झोपेखेरीज तिच्या व्यस्त दिनचर्येमध्ये देखील माधुरी जमेल तेव्हा एखादी डुलकी काढून घेत असते.

Leave a Comment