रेड कॉरिडॉरचा बीमोड हेच नक्षली हिंसेला उत्तर!


दीर्घकाळाच्या शांतीनंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा महाराष्ट्रावर आघात केला. भ्याडपणाने केलेल्या गडचिरोलीत पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमच्या सी-60 कमांडोंचे पथक गस्तीवर असताना हा हल्ला करण्यात आला. त्यात 16 जण हुतात्मा झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेला स्फोट एवढा जबरदस्त होता, की हे कमांडो ज्या बसमध्ये प्रवास करत होते त्या बसचे तुकडे-तुकडे झाले.

सी-16 कमांडोंची स्थापना नक्षलवादाला नेस्तनाबूत करण्यासाठीच करण्यात आली होती. याच पथकाने गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्याच कारवाईचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. अचानक छापा टाकून हल्ला करण्यासाठी नक्षलवादी ओळखले जातात. पोलिसांचे कमांडोही सतर्क असतात आणि नक्षलवादाशी लढण्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण दिलेले असते. मात्र यावेळी नक्षलवाद्यांनी कुटील पद्धतीचा वापर करून आधी दादापूर येथे 36 वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर कुरखेड्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविला. त्यात या जवानांना हौतात्म्य आले.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे सगळे टप्पे पार पडल आहेत, त्यामुळे मतदानावर या हल्ल्याचा परिणाम होणार नाही. मात्र या हल्ल्याने नक्षलवादाच्या धोक्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा वेधले आहे. गेल्या काही काळापासून नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला नव्हता, त्यामुळे असे वातावरण निर्माण झाले होते की नक्षलवाद आता काबूत आला आहे. सरकारने 2009 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण 726 जिल्ह्यांपैकी 10 राज्यांतील 180 जिल्हे नक्षलग्रस्त होते, मात्र आता 74 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे या भागांमध्ये शांती असल्याचे वाटत होते. मात्र या हल्ल्याने हे सिद्ध केले आहे, की नक्षलवाद असा एका फटक्यात संपणार नाही आणि त्याचा धोका अद्याप कायम आहे. त्यांची पाळेमुळे येथे खोलवर गेली आहेत आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी ते पुन्हा गळा वर काढतात.

गडचिरोलीतील हल्ला सरकारी पातळीवर गांभीर्याने घेतला जाईलच, परंतु हा हल्ला धोक्याचा आणखी एक इशारा आहे. याचे कारण म्हणजे देशातील सुमारे 10 टक्क्यांपेक्षा जास्त भागात नक्षलवादाचा प्रभाव आहे. या भागाला रेड कॉरिडॉर म्हणजे लाल पट्टा म्हणून ओळखले जाते.या रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवाद्यांचे समांतर सरकार चालते.

महाराष्ट्रात तसे पाहिले तर नक्षलवादग्रस्त भाग तसा कमीच आहे, गडचिरोली, चंद्रपुर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत त्यांचा वावर आहे. परंतु छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा या राज्यांतील फार मोठा भाग नक्षलग्रस्त आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगाणा, पश्र्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांतील भाग या रेड कॉरिडॉरमध्ये मोडतो. रेड कॉरिडॉरचा मोठा हिस्सा याच राज्यांमध्ये असून तो पार नेपाळ सीमेपासून तिरुपतीपर्यंत पसरला आहे. मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतात असलेल्या या भागांमध्ये नक्षलवादी हिंसा ही सामान्य बाब आहे. नक्षलवाद्यांना माओवादी म्हणूनही ओळखले जाते आणि हे भाग म्हणजे माओवाद्यांचे गड आहेत. याच माओवादी विचारसरणीच्या फुटीरतावाद्यांनी आपले बस्तान बसविल्यानंतर गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून बदनाम झाला.

या रेड कॉरिडॉरमध्ये येणारे जिल्हे हे देशातील सर्वात दरिद्री भाग आहेत. या भागात खनिजाच्या खाणी असून वनसंपदाही आहे. मात्र त्यांचा विकास करण्याला हेच नक्षलवादी व माओवादी विरोध करतात हाही एक विरोधाभास आहे. कालच्या हल्ल्यातही नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामाच्या एका प्रकल्पाला लक्ष्य करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या माओवाद्यांना दुर्गम भागात विकासही होऊ द्यायचा नाही आणि मागास भागांच्या शोषणाची बोंब ठेवत आपली पोळीही भाजून घ्यायची आहे. आपले बस्तान कायम रहावे यासाठी हे नक्षलवादी हिंसक मार्गांचा वापर करतात. त्यामुळे सर्वाधिक हाल होतात ते तेथील लोकांचे.

देशातील एवढा मोठा भाग हिंसाग्रस्त असावा ही चिंतेची गोष्ट आहे. आपल्याकडे सुरक्षा म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय सुरक्षा (पाकिस्तान व चीन!) असे मानले जाते, परंतु नक्षलवाद ही आता बाह्य आक्रमणापेक्षा मोठी चिंतेची बाब झाली आहे. या भागांचा विकास व्हायचा असेल तर त्यांचा हिंसाचार मोडून काढणे अनिवार्य आहे. ‘विध्वंसाला उत्तर विकास आणि गोळीला उत्तर गोळी’ याच मार्गावरून आपल्याला चालावे लागणार आहे. रेड कॉरिडॉरचा बीमोड हेच नक्षली हिंसेला उत्तर ठरणार आहे.

Leave a Comment