‘डान्स इंडिया डान्स’ शोच्या निर्णायकपदी करीना कपूर!


छोट्या पडद्यावर भारतभरातील हौशी आणि व्यावसायिक नृत्य कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी ‘डान्स इंडिया डान्स’ हा टीव्ही शो उत्तम मंच उपलब्ध करून देत असतो. या रियॅलिटी शोच्या आगामी भागांमध्ये ‘जज’ म्हणून सहभागी होण्यासाठी सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानला आमंत्रित करण्याचा विचार केला जात असल्याचे समजते. यासाठी संबंधित वाहिनी आणि करीनाच्या टीममध्ये चर्चा सुरु असल्याचेही वृत्त आहे. यामध्ये करीनाचे मानधन किती असणार आहे, एका दिवसामध्ये किती तास काम करावे लागणार आहे, आणि संपूर्ण मालिका किती दिवसांपर्यंत सुरु रहाणार आहे, या सर्व बाबींवर चर्चा सुरु असल्याचे समजते.

प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुसार करीनाचे नाव विचाराधीन असले, तरी याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या शो साठी वाहिनीला ‘ए लिस्ट’ अभिनेत्रीची आवश्यकता असल्याने करीनाचे नाव विचाराधीन असल्याचे समजते. करीनाने या शोच्या एका भागासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांचे मानधन मागितले असून, तितके मानधन देण्यास वाहिनीच्या वतीने कोणत्याही प्रकारची हरकत घेतली गेली नसल्याचे समजते. हा शो तीन महिने चालणार असून, २५-२८ भाग या दरम्यान चित्रित केले जाणार आहेत. त्यामुळे जर या शोमध्ये निर्णायकपदी करीना येणार असली, तर तिला तीन महिने चालणाऱ्या या शोसाठी सुमारे ऐंशी कोटी रुपयांचे मानधन दिले जाणार असल्याचे समजते.

या पूर्वीही अनेक बॉलीवूड तारका अनेक रियॅलिटी शोजमध्ये जजच्या भूमिकेमध्ये दिसल्या आहेत. यांमध्ये माधुरी दीक्षित ‘डान्स दिवाने’ या शोच्या मागील चारही सीझन्समध्ये निर्णायकपदी दिसली असून, माधुरीने शोच्या प्रत्येक भागासाठी एक कोटी रुपये मानधन घेतले आहे, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने ‘सुपर डान्सर’ शो साठी पंचवीस कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे समजते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिये’च्या प्रत्येक भागासाठी एक कोटी रुपयांचे मानधन आकारले असून, जॅकलीन फर्नांडीस हिने ‘झलक दिखला जा’ या डान्स शोला जज करण्यासाठी प्रत्येक भागाचे १.२५ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे समजते.

Leave a Comment