परीक्षेमध्ये ‘कॉपी’विरुद्ध नियमावली लागू झाल्याने उत्तर प्रदेशातील १६५ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल.


अलीकडेच उत्तर प्रदेश राज्याच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लागले असून, या परीक्षांच्या निकालानंतर मोठे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील सुमारे १६५ शाळांमधून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नसून, या शाळांचे निकाल शून्य टक्के लागल्याचे हे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. इतकेच नव्हे तर इतर ३८८ शाळांचा निकाल वीस टक्क्यांहूनही कमी लागला आहे, म्हणजेच या शाळांमधील सुमारे वीसच टक्के विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले आहेत. गेली अनेक वर्षे शंभर टक्के निकाल देणाऱ्या या शाळांचे निकाल शून्य टक्के आणि वीस टक्क्यांहूनही कमी कसे या प्रश्नाचे उत्तर, उत्तर प्रदेश स्टेट बोर्डने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये आहे.

या नियमावलीच्या अंतर्गत परीक्षांमध्ये होणारी ‘कॉपी’ रोखाण्यासाठी अतिशय कडक नियम लागू करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील कौशांबी प्रांतातील शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षांमध्ये ‘कॉपी’ अगदी राजरोसपणे चालत असे. त्याचप्रमाणे अलिगढ आणि मैनपुरी प्रांतातील शाळांमध्ये हा गैरप्रकार नेहमीचाच झाला होता, पण यंदा उत्तर प्रदेश शैक्षणिक बोर्डाने लागू केलेल्या कडक नियमावलीमुळे एरव्ही राजरोस चालणारे हे गैरव्यवहार बंद झाले, आणि उत्तर प्रदेशातील अनेक शाळांचे निकाल चक्क शून्य टक्के लागले. यामध्ये प्रयागराजमधील सात शाळांचे निकाल शून्य टक्के लागले असून, मिर्झापूर मधील सहा, इटाह मधील सहा, बलिया आणि गाझीपुरमधील प्रत्येकी पाच, हरदोई मधील चार, आझमगढ, अलिगढ, चित्रकूट, प्रतापगढ, श्रावस्ती मधील प्रत्येकी तीन शाळांचे निकालही शून्य टक्के लागले आहेत.

या शाळांच्या यादीमध्ये बाहरैच, मऊ, जौनपुर, सोनेभद्रा, शाहजहानपूर, कन्नौज, देओरीया, वाराणसी, चंदौली, आग्रा, मोरादाबाद, बरेली, रायबरेली इत्यादी ठिकाणच्याही शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये काही शाळा सरकारी असून, काही शाळा निमसरकारी आणि इतर सर्व शाळा खासगी आहेत.

Leave a Comment