भारतातील या एकमेव घराला आहे ISO 9000 सर्टिफिकेशन


भारतातील तमिळ नाडूची राजधानी चेन्नई येथे रहात असणाऱ्या सुराणा परिवाराकडे जर एखादी व्यक्ती चहाला गेली, तर त्या घरामध्ये ती व्यक्ती केवळ पाहुणी नसून, ‘टेम्पररी कस्टमर’ही असते. किंबहुना चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुणचाराचा अनुभव, पाहुण्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ एकंदरीत कसे काय वाटले हे जाणून घेण्यासाठी पाहुण्यांना ‘फीडबॅक फॉर्म’ ही दिला जातो. अशा या घरामध्ये सर्व सामान्य नागरिकच नाही, तर अनेक नामवंत सेलिब्रिटीजनी ही पाहुणचार घेतला आहे, आणि या सर्वांनीच आपला पाहुणचार सर्वार्थाने अतिशय उत्तम झाल्याची पसंतीची पावतीही दिली आहे. असा पाहुणचार करणारे हे घर केवळ चेन्नईमधलेच नाही, तर संपूर्ण भारतातील एकमेव ISO 9000 सर्टिफाईड घर असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निश्चित जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे त्या घरामध्ये राहणारे आजोबा हे ‘घराचे प्रमुख’ असून, आजी ‘घरातील सर्व कारभारावर देखरेख करणारी प्रतिनिधी’ आहे. या घरातील सूनबाईंच्या हाती व्यवस्थापनाची जबाबदारी असून, घरातील मुलगा आणि नातवंडे ही या घराचे ‘पर्मनंट कस्टमर्स’ आहेत. ISO सर्टिफिकेशन, एखाद्या गोष्टीचा आंतराष्ट्रीय प्रमाणांच्या अनुसार दर्जा निश्चित करणारे प्रमाणपत्र असून, हे प्रमाणपत्र मिळालेल्या कंपनीअंतर्गत किंवा संस्थेअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृत दर्जाच्या असतात.

चेन्नईमध्ये राहणाऱ्या सुराणा परिवाराला आपल्या घरासाठी ISO 9000 प्रमाणपत्र घेण्याची कल्पना सुचली कशी याची हकीकत मोठी रोचक आहे. सुराणा परिवारातील बहुतेक परिवारजन पेशाने वकील आहेत. घरातील आजी-आजोबांपासून सून आणि मुलगा देखील याच व्यवसायामध्ये आहेत. २००४ साली ‘सुराणा अँड सुराणा’ या लॉ फर्मसाठी ISO प्रमाण पत्र घेण्याचा निर्णय सुराणा परिवाराने घेतला, तेव्हा आपल्या घरासाठी देखील हे प्रमाणपत्र घेण्याची कल्पना त्यांना सुचली. त्याप्रमाणे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व आवश्यक बाबींची तत्परतेने पूर्तता केल्यानंतर सुराणा यांच्या घराला देखील ISO प्रमाणपत्र मिळाले.

सुराणा परिवारातील सर्वच परिवारजन अतिशय शिस्तप्रिय आहेत. म्हणूनच त्यांच्या घरातील सर्व वस्तूंची नोंद ठेवली जाते. अगदी घरातील साठवणीच्या खोलीमध्ये असलेल्या वस्तू देखील ‘लेबल’ करून ठेवलेल्या आढळतात. दर तीन महिन्यांनी घरातील वस्तूंचे ‘स्टॉक चेकिंग’ होते, आणि त्यानंतरच आवश्यक त्या वस्तू घरामध्ये मागविल्या जातात. वस्तू ज्यांकडून आणावयाच्या ते दुकानदारही उत्तम ‘रेटिंग’ मिळाले असल्याची खात्री केली जाते. या शिवाय घरातील सर्वांच्याच दैनंदिन कार्यक्रमांची व्यवस्थित आखणी केलेली असते. स्वयंपाकामध्ये कोणते पदार्थ तयार केले जावेत इथपासून जेवणाच्या वेळेपर्यंत सर्व गोष्टी आधीपासून ठरविल्या गेलेल्या असतात. रोजच्या भोजनामध्ये असणारे पदार्थ ही अशा प्रकारे ठरविले जातात, जेणेकरून भोजनामध्ये वैविध्य राखले जाईल. या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना देखील खाण्यापिण्यातील त्यांच्या आवडीनिवडी विचारून त्याप्रमाणे भोजन तयार केले जाते.

या घरातील दैनंदिन कारभार घड्याळाच्या काट्याबरहुकुम चालतो. किंबहुना महत्वाच्या कामांपासून ते अगदी किरकोळ कामांसाठीही वेळ आधीपासूनच निश्चित केली जाते. किंबहुना जर हे वेळापत्रक पाळले गेले नाही, तर सर्व कामे वेळेमध्ये पूर्ण करणे अशक्य असल्याचे सुराणा परिवारजन म्हणतात. इतकेच नव्हे तर स्वतःला ‘ISO crew’ म्हणविणाऱ्या या परिवारामध्ये दर सहा महिन्यांनी ‘ऑडीट चेक्स’ही होत असतात. अशा प्रकारे उत्तम क्वालिटी कंट्रोल असणारे असे हे घरकुल आहे.

Leave a Comment