पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी घेतलेली मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान पंतप्रधानांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी अनेक रोचक तथ्ये जनतेच्या समोर आली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी कथन केलेले देश-विदेशातील अनेक अनुभव जनतेला ऐकायला मिळालेच, पण त्याचसोबत पंतप्रधानांशी झालेल्या गप्पांमध्ये त्याच्या जीवनशैलीविषयी अनेक बाबी नव्याने ऐकायला मिळाल्या. उत्तम आरोग्य जपण्यासाठी पंतप्रधान मोदी अनेक घरगुती उपायांचा अवलंब करीत असल्याचे या मुलाखतीमधून स्पष्ट झाले.
उत्तम आरोग्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांचा घरगुती उपचार पद्धतींवर संपूर्ण विश्वास असून, अचानक उद्भविलेल्या लहान सहान आजारांसाठी घरगुती उपायांचा अवलंब ते करतात. जेव्हाही त्यांना सर्दी पडश्याचा त्रास होतो, तेव्हा ते दिवसभर कोमट पाण्याचे सेवन करतात आणि दोन दिवस उपवास करतात. त्याचबरोबर नाक मोकळे राहून श्वासोच्छ्वास चांगला राहावा यासाठी रात्री झोपताना मोहोरीचे तेल कोमट करून त्याचे काही थेंब नाकपुड्यांमध्ये सोडल्याने नाक बंद होत नसल्याचे पंत प्रधान म्हणतात. या उपायांचा अवलंब केल्यावर इतर कोणत्याही औषधोपचारांच्या मदतीविना, केवळ दोन दिवसांत सर्दी बरी होत असल्याचेही पंतप्रधान म्हणतात.
कधी पायदुखी सतावू लागली, तर दूरवर पायी फिरून येणे पंतप्रधान पसंत करतात. त्याचबरोबर सतत प्रवासाने आणि अतिशय अनियमित, व व्यस्त दिनचर्येचे दुष्परिणाम त्वचेवर होऊ नयेत यासाठी पंतप्रधान एरंडेल चेहऱ्यावर लावणे पसंत करतात. या शिवाय त्वचेसाठी इतर कोणतेही प्रसाधन आपण वापरत नसल्याचे पंतप्रधान म्हणतात. दररोज रात्री झोपण्या पूर्वी चेहऱ्यावर एरंडेलाने मालिश करीत असल्याचे मोदींनी मुलाखतीमध्ये सांगितले. पंतप्रधान अतिशय सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून लोकप्रिय आहेत. आपल्या वर्तनामध्ये आणि विचारसारणीमध्ये सकारात्मकता जपण्यासाठी वेळेवर संतुलित आणि साधा आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि रागावर, भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणतात.