उत्खननामध्ये सापडले प्राचीन धातूच्या कारखान्यांचे अवशेष


पाकिस्तानातील पेशावर विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या पुरातत्ववेत्त्यांनी केलेल्या उत्खननामध्ये इंडो-ग्रीक काळातील धातूच्या कारखान्यांचे अवशेष सापडले आहेत. ही कारखाने ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामध्ये अस्तित्वात असल्याचे समजते. हे अवशेष पेशावर जवळील हयाताबाद या ठिकाणी सापडले असून, हे उत्खननाचे कार्य गेली तीन वर्षे सातत्याने सुरु असल्याचे समजते. या उत्खननामध्ये इंडो-ग्रीक कालीन धातूंच्या कारखान्यांच्या अवशेषांसोबत काही तत्कालीन धातूच्या मुद्राही सापडल्या आहेत. या मुद्रा ही तितक्याच प्राचीन असल्याचे पुरातत्ववेत्त्यांचे अनुमान आहे. त्या काळामध्ये इंडो ग्रीक संस्कृतीचे लोक अफगाणिस्तानमधून येऊन या प्रांतामध्ये वसले आणि सुमारे दीडशे वर्षे त्यांचे अधिपत्य या प्रांतावर राहिले असल्याचेही पुरातत्ववेत्त्यांनी सांगितले आहे.

उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांवरून, हे अवशेष एखाद्या धातूच्या वस्तू बनविणाऱ्या कारखान्याचे असावेत असा प्राथमिक अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी व्यक्त केला असून, या ठिकाणी सापडलेली लोखंड वितळविण्यासाठी वापरली जाणारी काहिली, तऱ्हे-तऱ्हेची धारदार अवजारे, ड्रिल समान वस्तू सापडल्या असल्याने येथे धातूंचे कारखाने असण्याचा अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी व्यक्त केला असल्याचे समजते. या अवशेषांवरून या कारखान्यांमध्ये धनुष्य, बाण, खंजीर, तलवारी आणि तत्सम हत्यारे बनविली जात असावीत असे अनुमान पुरातत्ववेत्त्यांनी व्यक्त केले आहे. त्या काळामध्ये या प्रांतामध्ये असे अनेक कारखाने अस्तित्वात असून, आतापर्यंतच्या उत्खननामध्ये सापडलेले हे पहिलेच अवशेष असल्याचे समजते.

Leave a Comment