हजारो वर्षांची परंपरा मोडणारी सम्राटाची प्रेमकथा


जपानचे सम्राट हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होत असून 1 मेपासून अक्षरशः एका नव्या युगाला सुरूवात झाली आहे. अकिहितो यांनी जपानच्या राजघराण्यात एका नव्या अध्यायाला सुरूवात केली होती आणि त्यात त्यांच्या प्रेमकथेचा मोठा भाग आहे.

जपानमध्ये 200 वर्षांत पदत्याग करणारे अकिहितो हे पहिले सम्राट ठरणार आहेत. आजवर जपानच्या अर्ध्या अधिक सम्राटांनी निवृत्ती पत्करून बौद्ध मठांमध्ये जीवन घालवले आहे. पण 19व्या शतकात ही प्रथा बंद पडली. अकिहितो हे 83 वर्षांचे असून आपल्या ढासळत्या प्रकृतीमुळे पद सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. “आपण आजपर्यंत जबाबदारीचे पालन केले आहे. पण आता वयोमानाप्रमाणे आणि प्रकृतीमुळे हे काम करणे कठीण होत आहे.” असे त्यांनी सांगितले होते. अकिहितो यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी, राजमहाल आणि जपानच्या कायदातज्ञांनी त्यासाठी तारीख निश्चित केली. त्यातून जपानचे आर्थिक आणि प्रशासकीय वर्ष सुरू होणारा 30 एप्रिल हा दिवस निश्चित करण्यात आला. जपानला आजवर आठ वेळा सम्राज्ञी लाभल्या आहेत, मात्र प्रचलित कायद्यानुसार केवळ पुरुषच सम्राट बनू शकतात.

राजकीय पातळीवर सम्राट हे राज्याचे नामधारी प्रमुख असतात, परंतु जपानी समाजात सम्राटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या संदर्भात प्रथा-परंपरा व संकेत अत्यंत कसोशीने पाळले जातात. मात्र याच अकिहितो यांनी 1950 च्या दशकात एक नवी क्रांती आणली आणि त्यासाठी कारणीभूत ठरली त्यांची प्रेमकथा.

त्यावेळी राजकुमार असलेले प्रिन्स अकिहिटो हे केवळ पदवीधर अशी ओळख असलेल्या मिचिको शोडा या तरुणीच्या प्रेमात पडले होते. एका टेनिस सामन्यात या दोघांची गाठ पडली होती. आजही या सामन्याला “लव मॅच” म्हणून ओळखले जाते. मिचिको या सामान्य कुटुंबातील होत्या आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा अर्थ होता राजघराण्याची 2,000 वर्षांची परंपरा मोडणे. मात्र त्यावेळेस वाढत असलेल्या वृत्तपत्र माध्यमे आणि दूरदर्शनच्या उदयामुळे या जोडीचे काम सुकर झाले. थोड्याच काळात मिचिकोंनी संपूर्ण जपानला वेड लावले. महिलांसाठीच्या नियतकालिकांमध्ये त्यांची छायाचित्रे सर्वत्र दिसू लागली. इतकेच नव्हे तर तोपर्यंत देवासमान असलेल्या राजघराण्याची जनसामान्यांतील प्रतिमाही बदलली. त्यांच्या केसांचे व कपड्यांचे अनुकरण होऊ लागले.

जपानच्या साम्राटांचे राजघराणे हे सध्या जगातील सर्वात जुने राजघराणे मानले जाते. प्राचीन काळापासून जपानवर एकाच वंशाचे राजे राज्य करीत आहेत. जपानचा पहिला सम्राट जिम्मू हा सूर्यदेवतेपासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. ख्रिस्तपूर्व 600 पासून आजतागायत कायम असलेले हे एकमेव राजघराणेआहे. इसवीसन 500 पासून आतापर्यंत अखंड परंपरा असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामुळे जपानचे राजघराणे हे त्या राष्ट्राचे जणू प्रतीक बनले आहे. गेली सुमारे तीन शतके जपानची राष्ट्रीय अस्मिता व राष्ट्रवाद हे राजघराण्याशीच निगडित होते. जपानमध्ये लोकशाही सरकार कार्यरत असले तरी देशाचा कारभार मात्र सम्राटांच्या नावाने चालतो. अकिहितो हे जपानचे 125वे सम्राट आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या जपानी सम्राटांना मानवी देवता मानले जाते. ते जनतेशी एकतर थेट संवाद करत नाहीत किंवा क्वचितच साधतात. मात्र सम्राट अकिहिटो यांनी सुरूवातीपासूनच शाही घराणे आणि सामान्य लोकांमध्ये असलेले हे अंतर कमी करण्यास सुरुवात केली होती. त्यात मिचिको यांच्याशी केलेल्या लग्नाने तर क्रांतीच केली. या क्रांतीमध्ये फोटोग्राफी आणि माध्यमांची मोठी भूमिका होती. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी त्याचे चित्रीकरण करणारे माजी टीव्ही निर्माते शेजो सुझुकी यांच्या मते, “शतकातील या रोमांसामुळे प्रत्येक जण भारावलेला होता.”

दुसऱ्या महायुद्धाच्या पराभवातून जपान बाहेर येऊ पाहत होता आणि एका नवीन जपानची प्रतिमा तयार करण्यासाठी परिश्रम करीत होता. आर्थिक प्रगती, भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने घरात येत होती आणि ह सर्व राजकुमाराच्या विवाहाच्या आगेमागेच घडले. म्हणूनच 10 एप्रिल 1959 रोजी या दोघांचे लग्न झाले तेव्हा त्यांची मिरवणूक पाहण्यासाठी अडीच लाखांहून अधिक लोक रस्त्याच्या कडेने उभे होते. अंदाजे एक कोटी 50 लाख लोकांनी हा विवाह टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिला. लग्नानंतरही या दोघांनी लोकांशी संपर्क कायम ठेवला. सम्राट व सम्राज्ञी म्हणून 1989 मध्ये त्यांची घोषणा झाल्यावरही त्यांनी जवळीक कायम ठेवली.

अकिहितो यांनी पद सोडल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी नारुहितो हे सत्तेची सूत्रे हाती घेतील. मात्र आपल्या प्रेमकथेतून एका महान राष्ट्राला सामाजिक क्रांतीच्या वळणावर आणणाऱ्या सम्राटाला हा देश कधी विसरणार नाही!

Leave a Comment