ॲडॉल्फ हिटलर – एका विकृतीची शोकांतिका


एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. कारण याच दिवशी, 30 एप्रिल 1945 रोजी, जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर याने स्वतःचे जीवन संपविले होते. त्याच्या मृत्यूने जगातील एका भीषण नरसंहाराचा अंत झाला होता. सैतानाचा अवतार किंवा प्रत्यक्ष नरराक्षस म्हणून हिटलरची ओळख आहे. पण त्याचे जीवन जेवढे भीषण तेवढेच कलंदर आणि रंगतदार होते, हे फार थोड्यांना ठाऊक असेल.

ब्राउनाऊ ॲम इन या गावी एलोइस व क्लारा पोलझल या दांपत्याच्या पोटी 20 एप्रिल 1881 रोजी ॲडॉल्फचा जन्म झाला. तो जर्मनीचा हुकूमशहा म्हणून ओळखला जात असला तरी हे गाव होते बव्हेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर! अॅडॉल्फचे वडील ऑस्ट्रियन सरकारच्या अबकारी खात्यात एक सामान्य अधिकारी होते आणि त्याची आई ही त्यांची तिसरी पत्नी होती. हिटलरला अनेक भावंडे होती; परंतु त्यांपैकी बहुतेकांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. त्याच्या सावत्र भावंडांपैकी एंजेला हिच्याशी अॅडॉल्फची विशेष जवळीक होती. पुढे तिच्याच थोरल्या मुलीच्या म्हणजे गेली रॉबलच्या प्रेमात अॅडॉल्फ पडला होता!

वयाच्या 19व्या वर्षी अॅडॉल्फने लिंझ रिअल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश केला. मात्र शिक्षणात फारशी प्रगती नसल्यामुळे त्याने 1904 मध्ये लिंझ रिअल स्कूल सोडले आणि स्टेर येथील शाळेत प्रवेश घेतला. अखेर वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. अॅडॉल्फला व्हायचे होते चित्रकार. त्यासाटी व्हिएन्ना येथील जगप्रसिद्ध अॅकॅडेमी ऑफ फाईन आर्ट्समध्ये त्याने 1907 मध्ये प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला यश आले नाही. इतकेच नाही तर त्याला पुन्हा परीक्षेस बसण्याची परवानगीही देण्यात आली नाही. तो 1913 पर्यंत व्हिएन्नात होता. हुकूमशाहीबद्दल अॅडॉल्फच्या मनात प्रेम व्हिएन्ना येथेच उत्पन्न झाले. लोकशाही म्हणजे मूर्खपणा आहे, असे त्याचे मत बनले.

त्यानंतर त्याच्या जीवनात मोठा टप्पा आला तो पहिल्या महायुद्धाचा. बव्हेरियाच्या सोळाव्या राखीव दलात त्याचा समावेश करण्यात आला. या युद्धात अॅडॉल्फने मोठी कामगिरी बजावली. त्याच्या साहस आणि निष्ठेबद्दल त्याला आयर्न क्रॉस देण्यात आला. मात्र युद्धात जखमी झाल्यामुळे त्याला 1916 मध्ये जर्मनीला परत आणण्यात आले. तेथून बरा झाल्यावर तो परत युद्धभूमीवर गेला. ऑक्टोबर 1918 मध्ये मात्र युद्धात जायबंदी होऊन त्याला काही काळ अंधत्वही आले होते.

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यामागे राजकारणी लोक कारणीभूत होते, असे अॅडॉल्फचे मत बनले. जानेवारी 1919 मध्ये तो म्यूनिकला आला. त्याच दरम्यान त्याची सैन्यात आदेशाधिकारी (इन्स्ट्रक्शन ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली. सप्टेंबर 1919 मध्ये जर्मन कामगार पक्षात सामील होण्याचा आदेश मिळाल्यावरून अॅडॉल्फ त्या पक्षात गेला. अॅडॉल्फने प्रवेश केला तेव्हा या पक्षात केवळ सात सभासद होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली हा पक्ष नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणून प्रसिद्ध झाला. याचेच संक्षिप्त रूप पुढे नाझी असे झाले.

त्याने हा पक्ष बळकट केला. त्यासाठी स्वयंसेवक संघटना (स्टॉर्मटृपर्स) तयार करून बेकार लष्करी जवानांचा तीत समावेश करण्यात आला. त्याच काळात 1921 मध्ये दहशतवादाच्या आरोपावरून अॅडॉल्फला तीन महिन्यांची शिक्षा झाली, परंतु एका महिन्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर 8 नोव्हेंबर 1923 रोजी बव्हेरियात सशस्त्र बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याबद्दल त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. मात्र नऊ महिन्यांनंतर तो बाहेर आला. तुरुंगाबाहेर आल्यावर हिटलरने पुन्हा पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला आणि येथून त्याच्या राजकीय वाटचालीला सुरूवात झाली.
डिसेंबर 1921 मध्ये नाझी पक्षाने प्रांतिक निवडणुकांत मोठे यश मिळविले. त्यानंतर 1930 च्या जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम जर्मनीवर मोठ्या प्रमाणात झाले आणि कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या नाझी पक्षाची लोकप्रियता वाढली.

जानेवारी 1933 मध्ये हिटलरची नेमणूक चान्सेलर म्हणजे पंतप्रधानपदी झाली. जर्मनीच्या संसदेत नाझी पक्ष बहुमतात आला होता. त्यानंतर नाझी राजवट सुरू झाली आणि 14 जुलै 1933 रोजी गैर-नाझी पक्षांवर बंदी घालण्यात आली. विशेष कायदे करून ज्यूंना अधिकार नाकारण्यात आले. विरोधकांचे खून करून त्याने त्यांचा काटा काढला. दोन ऑगस्ट 1934 रोजी हिटलर जर्मनीचा अध्यक्ष झाला. आता तो अध्यक्ष, चान्सेलर, सरसेनानी आणि नाझी पक्षप्रमुखही होता. पुढे 1938 मध्ये त्याने संरक्षणखाते स्वतःकडे घेतले आणि खऱ्या अर्थाने तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. पुढच्याच वर्षी दुसरे महायुद्ध सुरू झाले. महायुद्धाच्या पहिल्या टप्प्यात जर्मनीची आगेकूच चालू होती, परंतु अखेर मित्र देशांपुढे त्याचा पाडाव झाला. बर्लिन शहर रशियन सेनेच्या ताब्यात जात असताना त्याने आपली प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्याशी लग्न केले. त्यानंतर काही क्षणांत त्याने आत्महत्या केली.

माणूस म्हणून तो संशयी व कपटी असल्याने त्याला प्रत्येक व्यक्तीबद्दल संशय वाटे. विरोध तर त्याला बिल्कुल सहन होत नसे. त्याच्या राजवटीत सुमारे साठ लाख ज्यूंचा बळी देण्यात आला. शासक आणि नेता म्हणून हिटलर कसाही असो, परंतु त्याची युद्धातील कर्तबगारी प्रभाशाली होती. त्याने मोठी प्रगती घडवून जर्मनीला समर्थ बनवले; मात्र महायुद्धात झालेल्या हानीमुळे या प्रगतीचा काडीमात्र उपयोग जर्मनीला झाला नाही. एका विकृतीची शोकांतिका म्हणून त्याने इतिहासात स्थान मिळविले एवढे खरे.

Leave a Comment