हे बॉलीवूड स्टार्स आहेत सुप्रसिद्ध बॉलीवूड खानदानांचे जावई


बॉलीवूडच्या जुळणाऱ्या आणि तुटणाऱ्या नात्यांच्या झगमगत्या दुनियेमध्ये पारिवारिक नातेसंबंध ही एक खास बाब आहे. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांचे आपापसात पारिवारिक संबंध आहेत. काही सिने-अभिनेते सुप्रसिद्ध बॉलीवूड परिवारांचे जावई आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचे देता येईल. अक्षय याचा विवाह अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्याशी झाला असून, अभिनेते राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांचा अक्षय, जावई आहे. अक्षय आणि ट्विंकल यांचा विवाह २००१ साली झाला होता.

बॉलीवूडमध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेला अभिनेता कुणाल खेमू, अभिनेता म्हणून फारसा यशस्वी ठरला नसला, तरी त्याच्या काही चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुणालचा विवाह सोहा आली खान हिच्याशी झाला असून, सोहा, ही अभिनेत्री शर्मिला टागोर आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौडी यांची कन्या आहे. सोहाचा थोरला भाऊ सैफ अली खान हा देखील नावाजलेला अभिनेता असून, सैफचा विवाह करीना कपूरशी झालेला आहे.

अतिशय गाजलेल्या ‘कोलावेरी डी’ या गीताने दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांची ओळख बॉलीवूड चाहत्यांच्या पर्यंत पोहोचविली. सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांच्या मुलीचा विवाह धनुष यांच्याशी झालेला आहे. धनुषने ‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी धनुषचा विवाह २००४ साली झाला होता. अभिनेता कुणाल कपूरने ‘डॉन -२’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या. कुणाल कपूरने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांच्या कन्येशी विवाह केला आहे.

अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानची गणना एके काळी बॉलीवूडमधील सर्वात देखण्या अभिनेत्यांमध्ये केली जात असे. सध्याच्या काळामध्ये मात्र फरदीन अभिनय क्षेत्रापासून लांबच आहे. १९७०च्या दशकामध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या मुमताझ यांची कन्या नताशा हिच्याशी फरदीनने २००५ साली विवाह केला. फरदीनने बॉलीवूडमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम अगन’ या चित्रपटाने केली होती. बॉलीवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगनचा विवाह अभिनेत्री काजोलशी झाला असून, काजोलची आई तनुजा, मावशी नूतन आणि आजी शोभना समर्थ या तिघीही प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ‘थ्री इडियट्स’मध्ये ‘राजू रस्तोगी’ची भूमिका साकारलेला अभिनेता शर्मन जोशी, बॉलीवूडचे लोकप्रिय ‘व्हिलन’ प्रेम चोप्रा यांचा जावई आहे.

Leave a Comment