सिम्बाकुब्वा कुटोकाफ्रिका – अडगळीतील ड्रॉवरमधून उद्भवलेला भयानक प्राणी!


हे जग जेवढे विविधतांनी भरलेले तेवढेच वैचित्र्यांनीही भरलेले आहे. म्हणूनच नित्यनवीन काही शोध लागतात आणि जगाला अचंबित करतात. गंमत म्हणजे हे शोधही अगदी योगायोगानेच लागतात आणि माणसांच्या ज्ञानात नवी भर पडते.

आता हेच पाहा ना. सिम्बाकुब्वा कुटोकाफ्रिका या प्राण्याचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? पैजेवर सांगता येईल की ऐकला नसेल. अगदी डिस्कव्हरी किंवा अॅनिमल प्लॅनेट यांसारख्या वाहिन्यांवरही त्याची माहिती मिळणार नाही. कशी मिळेल, आता आता या प्राण्याचा शोध लागला आहे. म्हणजे कधी काळी या पृथ्वीवर हा प्राणी अस्तित्वात होता, असे कळाले आहे. हे सगळे झाले तेही अगदी योगायोगाने!

ओहियो युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील एक जीवशास्त्रज्ञ नॅन्सी स्टीव्हन्स या केनियात पर्यटनाला गेल्या होत्या. तेथे एका संग्रहालयात एका ड्रॉवरमध्ये त्यांना खडकाचा तुकडा आढळला. या तुकड्यात एक लांबलचक दात होता. त्याक्षणी त्यांना कळाले, की आपल्या हाती काहीतरी घबाड लागले आहे. काहीतरी महत्त्वाचे आपल्याला मिळाले आहे.

हा खडक आणि तेथे ठेवलेल्या अन्य वस्तू म्हणजे दुर्लक्षित करण्यात आलेले जीवाश्म होते. पश्चिम केनियात 1980 मध्ये हे जीवाश्म सापडले होते मात्र त्यांचा कधी योग्य अभ्यास झाला नव्हता. राजधानी नैरोबीतील नॅशनल म्यूझियम ऑफ केनिया या संग्रहालयात त्या ठेवण्यात आल्या होत्या. हे जीवाश्म दुसऱ्या कुठल्या प्राण्याचे नसून याच सिम्बाकुब्वा कुटोकाफ्रिका या विचित्र नावाच्या प्राण्याचे होते. या पृथ्वीतलावर वावरणाऱ्या सर्वात मोठ्या मांसाहारी जनावरांपैकी हा एक प्राणी होता. आफ्रिका खंडात 2 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी या प्राण्याचा वावर होता.

स्टीव्हन्स यांना हा खडक दिसून आला तो 2010 मध्ये. तब्बल नऊ वर्षांनंतर त्यांनी या जीवाश्माचे संशोधन पूर्ण केले आणि या महिन्यात जर्नल ऑफ व्हर्टेब्रेट पॅलेंटॉलॉजी या नियतकालिकात त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. मॅथ्यू बॉर्थ्स या शास्त्रज्ञाने त्यांना संशोधनात मदत केली. मॅथ्यू बॉर्थ्स हे 2013 मध्ये संशोधन करत असताना याच संग्रहालयात आले. त्यावेळी हायना म्हणजे तरस या नावाखाली ठेवलेले जीवाश्म त्यांना दाखवण्यात आले. त्यांच्याकडे एक नजर टाकताच हे अवशेष तरसाचे नसून अन्य कुठल्या तरी प्राण्याचे आहेत, असे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी स्टीव्हन्स यांच्यासोबत 2017 साली संशोधनास सुरूवात केली.

सिम्बाकुब्वा या शब्दाचा स्वाहिली भाषेतील अर्थ आहे ‘मोठा सिंह’, परंतु वाघ किंवा सिंहासारखा तो मार्जार कुळातील प्राणी नाही. कुटोकाफ्रिका या शब्दाचा अर्थ आहे आफ्रिकेतील. हा सिम्बाकुब्वा कुटोकाफ्रिका हा प्राणी अजस्र म्हणावा असा होता. आज आपण पाहतो त्या सर्व मांसाहारी प्राण्यांपेक्षा तो आकाराने मोठा होता. त्याची कवटी ही गेंड्याच्या कवटीएवढी होती. एका-एका केळाएवढे त्याचे दात होते, त्याचे वजन सुमारे एक टन होते आणि तो 2.5 मीटर लांब होता, असे या संशोधनात आढळले.

“मी अभ्यास करत असलेले बहुतेक नमुन हे अत्यंत छोटे असतात, त्यामुळे मी ड्रॉवर उघडल्यानंतर त्यात हा लांबलचक दात पाहिल्यानंतर मला किती आश्चर्य वाटले असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता,”असे स्टीव्हन्स म्हणतात. त्यांना सापडलेले अवशेष हे एका कुमारवयीन प्राण्याचे आहेत. त्यामुळे पूर्ण वयाच्या प्राण्याचा आकार आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. आता नष्ट झालेल्या या प्राण्याचा आकार ध्रुवीय अस्वलापेक्षाही मोठा होता, असा अंदाज आहे.

सिम्बाकुब्वा हा प्राणी सुमारे 6 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी अवतरलेल्या ह्यानोडोंट्स या प्राणीकुळातील जीव होता. डायनॉसॉर या जगातून नाहिसे झाल्यानंतर 40 लाख वर्षांनंतरची ही घटना आहे. वाघ आणि लांडग्यांसारखे मांसाहारी प्राणी येण्यापूर्वी सिम्बाकुब्वा आले होते. सुमारे 90लाख वर्षांपूर्वी तो पृथ्वीवरून नाहीसा झाला, असे स्टीव्हन्स यांचे संशोधन सांगते. या शोधामुळे ह्यानोडोंट्स हे प्राणीकूळ का नष्ट झाले, याचा उलगडा करणे शास्त्रज्ञांना शक्य होईल, असा अंदाज आहे.

Leave a Comment