श्रीलंकेतील वाढता कट्टरवाद, भारताची डोकेदुखी


श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात सुरक्षा दलांसोबत चकमकीत आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट करून घेतला. त्यामुळे सहा मुले आणि तीन महिलांसह किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या रविवारी श्रीलंकेत झालेल्या चर्च हल्ल्याला एक आठवडा होत असताना ही घटना घडली आहे.

ईस्टरनिमित्त प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमलेल्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या स्फोटात 235 जण ठार झाले होते, तर 500 जण जखमी झाले आहेत. यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. या स्फोटाच्या संदर्भात सुरक्षा दलांनी नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या स्थानिक दहशतवादी गटाच्या विरोधात शोधमोहीम तीव्र केली आहे. ही कारवाई करतानाच शुक्रवारी रात्री ही चकमक झाली. या स्फोटांच्या संदर्भात पोलिसांनी अन्य 20 जणांना अटक केली आहे. तसेच दक्षिण कोलंबोतील वेल्लावट्टा या उपनगरात एका रेल्वे स्थानकाजवळ एक किलोग्राम स्फोटकेही जप्त केली. जोपर्यंत दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा होत नाही तोपर्यंत ही शोधमोहीम चालू ठेवण्याचा निर्णय देशाच्या सुरक्षा परिषदेने एका बैठकीत घेतला आहे.

या सर्व घडामोडींमुळे श्रीलंकेतील वाढत्या कट्टरवादाचाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असली, तरी श्रीलंकेच्या सरकारने एनटीजे या संघटनेला त्याबद्दल दोषी धरले आहे. त्यामुळे असे मानले जाते, की इसिस आणि एनटीजेने मिळून हे स्फोट केले आहेत.

एनटीजे ही नवी कट्टरपंथी संघटना आहे. यातील तौहीद शब्दाचा अर्थ “ईश्वर केवळ एक (अल्ला) आहे” असा होतो. या संघटनेच्या नावाचा अर्थ केवळ “अल्लाला मानणाऱ्या लोकांचा समूह” असा होतो. श्रीलंका तौहीद जमात या मूळ संघटनेतून फुटलेली ही एक नवी संघटना आहे, असे मानले जाते. श्रीलंका तौहीद जमातचा चिटणीस अब्दुल राजिक याला बौद्ध लोकांच्या विरोधात चिथावणीखोर भाषणे केल्याबद्दल 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या भाषणांबद्दल माफीही मागितली होती.

दहशतवादी कारवायांच्या संदर्भात एनटीजेचे नाव सर्वात प्रथम 2017 मध्ये पुढे आले होते. माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा 2015 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोदू बाला सेना या बौद्ध कट्टरवादी संघटनेने आपली मुस्लिमविरोधी मोहीम पुन्हा सुरू केली होती. त्यावेळी श्रीलंका तौहीद जमातमधून बाहेर पडून एनटीजे स्थापन झाली. ता. 26 डिसेंबर 2018 रोजी केगाले जिल्ह्यातील मेवानेला येथे काही बाईकस्वारांनी काही बुद्धमूर्त्यांची तोडफोड केली होती. त्यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती आणि त्यांनी आपण एनटीजेशी संबंधित असल्याचे सांगितले होते. याच संघटनेसी अन्य दोन जणांचा शोध घेताना पोलिसांना पुत्तलम जिल्ह्यातील एका शेतात मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळली होती. याच संघटनेशी संबंधित आणखी चार जणांना पोलिसांनी येथूनच अटक केली होती. तेव्हापासून एनटीजेला दहशतवादी संघटना म्हणून ओळख मिळाली.

श्रीलंकेची लोकसंख्या सुमारे 2 कोटी 10 लाख असून त्यात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 10 टक्के आहे. सिंहल-बौद्ध सुमारे 70 टक्के, तमिळ हिंदू 12.6 टक्के आणि सुमारे सात टक्के ख्रिस्ती आहेत. श्रीलंकेत 1990 नंतर वहाबी संप्रदायाचा परिणाम जाणवू लागला आणि तेव्हापासून इस्लामी कट्टरतावाद वाढू लागला. पूर्वेकडील बट्टीकलोआ आणि अंपारा या जिल्ह्यांमध्ये तो वेगाने वाढला. श्रीलंकेतील बहुतांश मुस्लिम हे तमिळ भाषक असून 1987 च्या आधी ते एलटीटीईचे समर्थन करत असत. मात्र 1987 मध्ये भारताची शांतिसेना श्रीलंकेत गेली तेव्हा मुस्लिम हे भारतीय सेनेसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय एलटीटीईला आला. त्यामुळे एलटीटीईने मुस्लिमांशी संबंध संपविले. एका रात्रीत जाफनातून सुमारे 90,000 मुस्लिमांना बेघर करण्यात आले. यातील काही जण आजही शरणार्थी शिबिरात राहतात.

श्रीलंकन मुस्लिम काँग्रेस या पक्षाने मुस्लिमांसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली होती, मात्र अन्य तमिळ लोकांनी त्याचे समर्थन केले नाही. म्हणूनच एलटीटीईने 90 च्या दशकाच्या सुरूवातीला कट्टनकुडी येथे दोन मशिदींवर हल्ला करून शेकडो लोकांना मारले. त्यानंतर तेथे नवीन मशिदी उभ्या राहिल्या आणि त्यांचा पैसा सौदी अरेबियातून आला, असे सांगण्यात येते. येथूनच वहाबी संप्रदाय वाढायला सुरूवात झाली. श्रीलंका सरकारच्या आकडेवारीनुसार, 32 युवक आतापर्यंत इसिसमध्ये सामील झाले आहेत. मात्र एनटीजेला काही मुस्लिमांचाही विरोध आहे. पीस लविंग मुस्लिम्स इन श्रीलंका या संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघ व श्रीलंकेच्या अध्यक्षांना पत्र लिहून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

भारताच्या दृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे एनटीजेशी मिळत्याजुळत्या तमिळनाडू तौहीद जमात नावाची एक संघटना तमिळनाडूत सक्रिय आहे. मात्र एनटीजेशी आपला काही संबंध नसल्याचे या संघटनेचे सरचिटणीस ई. मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे. या संघटनेचे आठ लाख सदस्य आहेत. श्रीलंका तौहीद जमात ही आपली साथी संघटना आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यात खरे किती, खोटे किती माहीत नाही परंतु भारताला सावध राहण्याची गरज आहे हे नक्की.

Leave a Comment