यंदाच्या वर्षी हे बॉलीवूड स्टार किड्स करणार सिनेसृष्टीत पदार्पण


अभिनेता मोहनीश बेहेल याची कन्या प्रनुतन बेहेल हिने नुकताच चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश केला आहे. सव्वीस वर्षे वयाच्या प्रनुतनने सलमान खान प्रोडक्शन्सच्या ‘नोटबुक’ द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. प्रनुतनच्या पाठोपाठ आणखीही काही बॉलीवूड स्टार किड्स यंदाच्या वर्षी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज होत आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे याची कन्या अनन्या पांडे, पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ मध्ये झळकणार असून हा चित्रपट मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या यश चोप्रांच्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक बनणार असून, या चित्रपटामध्येही अनन्या महत्वाची भूमिका करीत आहे.

अभिनेत्री डिम्पल खन्नाचा भाचा करण कपाडिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सिद्ध झाला असून, त्याची भूमिका असलेला ‘ब्लँक’ हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. बेहझाद खंबाटा या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, या चित्रपटामध्ये अक्षय कुमारही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी अक्षय एका गाण्यामध्ये पहावयास मिळणार आहे. या चित्रपटामध्ये करणच्या सोबत सनी देओल यांचीही भूमिका आहे. एका आत्मघातकी अतिरेक्याच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. सनी देओल-पुत्र करण देओलही आता चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश करण्यास सिद्ध असून, ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे करण अभिनयक्षेत्रात प्रवेश करीत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा खुद्द सनी देओल यांनी सांभाळली आहे.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यास सिद्ध असून, ‘आर एक्स १००’ या गाजलेल्या तेलगु चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान भूमिका करीत आहे. अभिनेत्री तारा सुतारीया अहानच्या नायिकेच्या भूमिकेमध्ये या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तारा, ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ मधेही दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयारी सुरु असून, लवकरच चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात येणाऱ्या ‘फाईट सिक्वेन्सेस’साठी सध्या अहान तयारी करण्यात व्यस्त असून, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित व्हायचे आहे. जून महिन्याच्या सुमाराला या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणे अपेक्षित आहे. सलमानची बहिण अलविरा खानची मुलगी अलीझेह दबंग-३ द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाली आहे.

Leave a Comment