असे आहे तुमच्या आवडत्या बॉलीवूड तारकांचे स्किनकेअर रुटीन


आपल्याला पडद्यावर दिसणारी आपली आवडती अभिनेत्री नेहमीच सुंदर दिसत असते, किंबहुना आपणही तिच्याचसारखे सुंदर दिसावे अशी इच्छा अनेक महिलांच्या, तरुणींच्या मनामध्ये असते. मात्र सुंदर आणि फिट दिसणे हे केवळ मेकअपच्या मुळे शक्य होते असे नाही, तर त्यासाठी या अभिनेत्री आपल्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेत असतात. किंबहुना दिवसभर निरनिराळी प्रसाधने, मेकअप, ब्युटी प्रोडक्ट्स यांचा मारा सातत्याने केसांवर आणि त्वचेवर होत असतानाच यांचे दुष्परिणाम त्वचेवर आणि केसांवर होण्याची शक्यता नेहमीच असते. म्हणूनच आपली त्वचा, केस आणि एकंदर फिटनेस जपणे हे अभिनेत्रींसाठी मोठे जिकीरीचे काम असते. म्हणूनच या तारका खास फिटनेस रुटीनचे पालन काटेकोरपणे करत असतात.

उत्तम अभिनयासाठी ओळखली जाणारी ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर हिला सुंदर त्वचेचे वरदान निसर्गदत्तच आहे. करीना आपल्या त्वचेच्या देखभालीसाठी मधाचा वापर नियमित करते. मधाने आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करीत काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुतल्यानंतर आपली त्वचा खूपच उजळ आणि नितळ दिसत असल्याचे करीना म्हणते. मधाच्या शिवाय त्वचेसाठी करीना बदामाचे तेल वापरणेही पसंत करते. बदामाचे तेल आणि दही यांचे मिश्रण आपल्या त्वचेला सौंदर्य देणारे असल्याचे करीना म्हणते. करीना प्रमाणेच प्रियांका चोप्रा देखील त्वचेसाठी दही वापरणे पसंत करते. दह्यामध्ये थोडेसे ओटमील, आणि हळद घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि अर्ध्या तासानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेवरील मृतपेशी नाहीशा होऊन चेहरा तजेलदार दिसत असल्याचे प्रियांका म्हणते.

अभिनेत्री सोनाक्षी कपूर आपल्या केसांसाठी खोबरेल तेलाचा मसाज पसंत करते. यामुळे केसांच्या मुळांशी रक्ताभिसरण सुधारत असून त्यामुळे केस सुंदर आणि मजबूत राहत असल्याचे सोनाक्षी सांगते. आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी सोनाक्षी मुलतानी मातीचा वापर करते. त्याचबरोबर कोरफडीचा गरही सोनाक्षी आपल्या त्वचेसाठी नियमित वापरते. कोरफडीचा वापर केल्याने चेहऱ्यावर आलेले डाग, मुरुमे नाहीशी होत असल्याचे सोनाक्षी म्हणते. अभिनेत्री यामी गौतम छोट्या पडद्यावर ‘फेअर अँड लव्हली’ वापरण्याचा सल्ला देत असली, तरी स्वतःच्या ‘फेअर अँड लव्हली’ त्वचेसाठी मात्र कच्चे दुध किंवा दही यांचा वापर करणे यामी पसंत करते. त्याचबरोबर मध, गुलाबजल, ऑलिव्ह ऑइल, ग्लिसरीन, आणि अंड्यातील पांढरा बलकही यामी त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरते.

Leave a Comment