या क्षेत्रात तरी भारत महासत्ता होणार तर…!


माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे. कलाम हे पदावर असताना त्यांचे एक आवडते स्वप्न होते ते म्हणजे 2020 पर्यंत भारताला महासत्ता करण्याचे. अर्थात देशाची सध्याची स्थिती पाहता हे स्वप्न काही इतक्यात तरी प्रत्यक्षात उतरेल असे वाटत नाही. मात्र आणखी एक क्षेत्र असे आहे ज्यात भारत निश्चितच महासत्ता होण्याचा दावा करू शकते. ते म्हणजे इंटरनेटच्या वापराचे क्षेत्र.

मॅकेंझी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेने सादर केलेल्या ताज्या अहवालात हे सूतोवाच करण्यात आले आहे. ‘डिजिटल इंडिया: टेक्नॉलॉजी टू ट्रांसफॉर्म ए कनेक्टेड नेशन’ असे या अहवालाचे नाव आहे. इंटरनेट ग्राहकांच्या संख्येच्या संदर्भात आता भारत हा केवळ चीनच्या मागे असून भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 56 कोटी आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन झालेली लोकसंख्या 3.6 कोटींनी वाढली आहे. एकट्या 2018 या वर्षात भारतातीलस्मार्टफोन धारकांनी 12.3 अब्ज अॅप डाऊनलोड केले आहेत. अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतीय लोक सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवतात. इंडोनेशियाचा अपवाद वगळला तर अन्य कोणत्याही देशाच्य तुलनेतभारत सर्वाधिक वेगाने डिजिटल होत आहे आणि भारतात विस्ताराला आणखी बराच वाव आहे. प्रति व्यक्ति उत्पन्नाशी तुलना केली तरी कोणताही देश या निकषांवर भारताच्या पातळीवर उभा राहू शकत नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

आता हा प्रश्न हा उपस्थित होतो, की ही स्थिती कशामुळे आली? याचे संक्षिप्त उत्तर म्हणजे आधार, जियो, जनधन आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी). जीएसटी लागू झाल्यानंतर 1.03 कोटी व्यावसायिक संस्था डिजिटल माध्यमातून करभरणा करू लागल्या आहेत. त्याच सोबत आणखी काही गोष्टींकडे मॅकेंझीच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. उदाहरणार्थ, वर्ष 2013नंतर इंटरनेट डेटाच्या किमतीत सुमारे 95 टक्क्यांची घट झाली आहे, तर फिक्स्ड लाईनवर डाऊनलोडचा वेग चौपट झाला आहे. यामुळे प्रति व्यक्ती मोबाईल डेटाचा वापर वार्षिक 152 टक्के वेगाने वाढला आहे. खेड्यापाड्यातील सामान्य लोकही आता ऑनलाईन बातम्या वाचतात, पाहतात, मित्रांशी गप्पा मारतात, पैशांची देवघेव करतात, चित्रपट पाहतात किंवा खरेदी करतात.

या अहवालानुसार, डिजिटल अर्थव्यवस्थेत वर्ष 2025 पर्यंत 6-6.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. डिजिटल उद्योगामुळे सुमारे 4-4.5 कोटी नोकऱ्या संकटात येतील, मात्र नवीन निर्माण होणारे रोजगार त्यापेक्षा जास्त असतील. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य मंत्रालयाशिवाय शिक्षण क्षेत्रालाही खूप फायदा होऊ शकतो. मोठ्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (आईओटी) यांचा लाभ घेऊ शकतील. मात्र हे सगळे काही आपोआप होणार नाही तर सरकार, व्यापार जगत आणि सामान्य लोकांना हे बदल आत्मसात करावे लागतील आणि डिजिटलीकरणाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी नव्या संधी शोधाव्या लागतील. तसेच डिजिटलीकरणाचे काही तोटेही आहेत. ते म्हणजे सोशल मीडियावरील द्वेषमूलक वातावरण आणि खासगीपणावर होणारा आघात. इंटरनेट वापरकर्त्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता देशात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या खूपच कमी आहे. याचे कारण म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये नसलेली जागरुकता नाहीत आणि क्षमतेत असलेली कमतरता.

तरीही कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रांचा अभ्यास, इंटरनेट, ब्लॉकचेन आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत विकासाची नवी शिखरे पार करेल, असा बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांना विश्वास आहे. किंबहुना डिजिटल विकासाला चौथी औद्योगिक क्रांती असेही म्हटले जाते. हे केवळ औद्योगिक परिवर्तन नाही, तर सामाजिक परिवर्तन आहे

त्यामुळे हे खूप मोठे आणि सतत विस्तार होणारे क्षेत्र आहे. इंटरनेट ही आपल्या जीवनावश्यक गोष्टींपैकी एक झाली आहे, नव्हे ती सर्वात प्रमुख जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. एकुणात म्हणजे अन्य कोणत्या क्षेत्राचे असो वा नसो, भारतात इंटरनेटचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. नवीन तंत्रज्ञान, त्यातील बदल, नवीन शोध हे सर्व काही सतत चालू राहणार आहेत. या महासत्तेचा लाभ आपण कसा घेणार आणि त्यात आपली जागा कशी शोधणार, हा आपल्यापुढचा खरा प्रश्न आहे.

Leave a Comment