भयपट ‘द कॉन्ज्यूरिंग’ फेम पॅरानॉर्मल विशेषज्ञ लोरेन वॉरन यांचे निधन


लोरेन वॉरन आणि त्यांचे पती एड वॉरन हे अमेरिकेतील अतिशय प्रसिद्ध परामनोविज्ञान (पॅरानॉर्मल) विशेषज्ञ दाम्पत्य होते. त्यांच्या गाठीला असलेल्या अनेक असामान्य घटनांच्या अनुभवांवर आधारित ‘द कॉन्ज्यूरिंग’ चित्रपटाची मालिका हॉलीवूडमधेच नाही, तर संपूर्ण जगभरातच अतिशय गाजली. लोरेन यांनी आपले पती एड यांच्या सहाय्याने अनेक ‘घोस्ट हंटिंग’च्या केसेस यशस्वीरीत्या सोडविल्या आहेत. अतिशय अद्भुत ‘शक्ती’ अंगी आलेल्या लोरेन वॉरन यांचे वीस एप्रिल रोजी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर हॉलीवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटीजनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोरेन यांनी आपले पती एड यांच्या समवेत १९५२ साली ‘न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’ या संस्थेची स्थापन केली होती.

लोरेन यांचे जावई टोनी स्पेरा यांनी सोशल मिडीयाच्या द्वारे लोरेन यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले असून, लोरेन यांचा अंत कोणत्याही यातनांच्या विना, त्या शांत झोपत असताना झाल्याचेही स्पेरा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोरेन आणि एड वॉरन यांच्या अनुभवांवर आधारित कथानक असलेला ‘द कॉन्ज्यूरिंग’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री व्हेरा फार्मिगाने लोरेनची भूमिका साकारली होती, तर पॅट्रिक जेम्स यांनी एड वॉरनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर याच चित्रपट मालिकेतील आणखी तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून या चित्रपटांनाही चांगले यश मिळाले.

लोरेन यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेक हॉलीवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मिडीयाच्या द्वारे व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री व्हेरा फार्मिगा हिने लोरेन सोबतची आपली अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर पोस्ट करीत लोरेनसोबतच्या आपल्या संभाषणांच्या आठवणीही शेअर केल्या आहेत. ‘कॉन्ज्युरिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर कलाकार मंडळींनीही त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment